Pimpri : पालिका साजरा करणार संविधान दिन; प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

नगरसेवक विकास डोळस यांची माहिती

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबरला सविधान दिन साजरा केला जाणार आहे. संविधान दिनाबाबत जनजागृती व्हावी, याकरिता प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम, संविधान शाहिरी जलसा, विविध स्पर्धांकरिता येणा-या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. याबाबतची माहिती स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी दिली. 

नगरसेवक डोळस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी 26 जानेवारी 1950 पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्या घटनेला 69 वर्षे होत असून, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचे सरकारचे आदेश आहेत. या दिवसापासून देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

याबाबत समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने 2008 मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे. त्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले जाणार आहे, असेही नगरसेवक डोळस यांनी सांगितले.

डोळस म्हणाले, संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.