Lonavala : ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी भाजे लेणी ते लोहगड किल्ल्या दरम्यान संपर्कचा हेरिटेज वाॅक

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे तसेच त्यांची युनेस्कोच्या य‍ादीत नोंद व्हावी याकरिता 22 डिसेंबर रोजी संपर्क बालग्राम या संस्थेच्या वतीने सह्याद्रीच्या पर्वत रांगेत दडलेल्या भाजे लेणी ते लोहगड किल्ल्या दरम्यान या हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या हेरिटेज वाॅकला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शासकिय तसेच सिने क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी या वाॅकमध्ये सहभागी होणार आहेत. मावळ तालुक्यातील भाजे लेणी, कार्ला लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला व विसापूर किल्ला या पुरातन व ऐतिहासिक वास्तूंची युनेस्कोमध्ये नोंद होऊन या भागाचा पर्यटनात्मक दृष्टया विकास व्हावा या करिता भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालग्राम या अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्या वतीने मागील चार वर्षांपासून हेरिटेज वाॅक ही नावीन्यपूर्ण संकल्पना समाजासमोर ठेवली आहे.
अतिशय प्राचीन व जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी कार्ला, भाजे व बेडसे लेणी सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहासाचे साक्षीदार असलेले लोहगड व विसापूर या किल्ल्यांचा पर्यटनात्मक दृष्टया विकास झाल्यास आजूबाजूच्या ग्रामीण भागासह मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच या ऐतिहासिक वास्तूंचे कायमस्वरूपी जतन झ‍‍ाल्यास येणार्‍या भावी पिढीकरिता तो अनमोल ठेवा असेल या उद्देशाने संपर्क संस्थेच्या वतीने हेरीटेज वॉक सुरू करण्यात आला असल्याचे संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी सांगितले.
भाजे लेणी ते लोहगड किल्ला असा साधारण साडेतीन किलोमीटर अंतराचा हा वॉक असून यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून इतिहासाच्या पाऊलखुणा तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे दर्शन होणार आहे. वॉकदरम्यान नागरिकांना वासूदेव, सोंगाडी, पोवाडे म्हणणारे शाहीर, जात्यावर दळण दळणार्‍या ग्रामीण महिला, भजन, किर्तन, मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी असे 16 प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. सोबतच भाजलेले शेंगदाणे, उकडलेले मक्याचे कणीस, वडापाव, चहा व सरते शेवटी वांग्याचे भरित, ठेचा व पिठलं भाकरीचा मराठमोळा मेजवानीचा बेत सहभागी नागरिकांना मिळणार आहे.
लोहगडाच्या पायथ्याजवळ इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यामध्ये महाराजांच्या काळातील दुर्मिळ अशी जवळपास साडेआठशे शस्त्र या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील.
अनाथ मुलांच्या संगोपनाकरिता निधी
 
संपर्क बालग्राम ही संस्था अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करते. संस्थेची स्थापना 1990 मध्ये अनाथ, निराधार, दुलर्क्षित व लाल बत्ती परिसरात काम करणार्‍या महिलांच्या मुलांचे शिक्षण, संगोपन व भविष्य निर्धारण करण्याच्या उद्देशाने झाली. सोबतच ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, कौशल्य विकास, औद्यागिक प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, ग्रामीण भागासाठी रुग्णालय याकरिता संपर्क संस्था काम करते. या वॉकच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा संपर्क संस्थेमध्ये राहणाऱ्या सदर अनाथ मुलांच्या संगोपन करता व शिक्षणाकरिता खर्च करण्यात येणार आहे. तसेच भाजे व लोहगड या दोन गावांच्या विकास कामांकरिता देखील सदरचा निधी काही प्रमाणात दिला जाणार असल्याची माहिती संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.