Talegaon News : चाकण-तळेगाव रोडवर कंटेनर-टेम्पोचा अपघात; टेम्पो चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज – चाकण-तळेगाव रोडवर एका कंटेनरने एका टेम्पोला धडक दिली. त्यात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तर टेम्पोमधील सहप्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 29) मध्यरात्री सव्वा एक वाजता इंदोरी गावच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवर घडला.

विजय यादवराव खांबट (वय 34, रा. सावरखेडा, पो. बोरगाव, सिल्लोड, औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. गजानन भानुदास डोकळे (वय 26, रा. मावळ) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक नियाज अहमद मोहमद मुस्लिम शेख (रा. वरळी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि विजय खांबट हे टेम्पोमधून (एम एच 14 / डी एम 1338) चाकण-तळेगाव रोडने जात होते. विजय हे टेम्पो चालवत होते. इंदोरी गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या टेम्पोला आरोपी चालवत असलेल्या कंटेनर (एन एल 01 / ए एफ 1929) ने समोरून धडक दिली. यामध्ये विजय हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात फिर्यादी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.