Pune Rain News : चिंचवडमध्ये 103 मिलीमीटर पाऊस. पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम

पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात पावसाने बुधवारी (दि. 1) जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. चिंचवडमध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बुधवारी शिवाजीनगर 75.4 मिलीमीटर, लोहगाव 86.2 मिलीमीटर, पाषाण 83.4 मिलीमीटर, चिंचवड 103 मिलीमीटर, लवळे 75 मिलीमीटर, मगरपट्टा 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरी भागासह मावळ, मुळशी, खेड आदी भागातही बुधवारी मुसळधार पाऊस झाला.

गेल्या चोवीस तासात कोकण गोव्यात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण गोवा व मराठवाड्यात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 12.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले. तर मुंबई (कुलाबा) येथे सर्वाधिक 24.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

कोरोनानंतर निसर्गाच्या प्रकोपामुळे बळीराजासमोर नवनवीन संकट उभी राहत आहेत. राज्यात अचानक अवकाळीचे संकट आल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापूस वेचणी सुरू असतानाच जर पाऊस पडला तर कापसाचे बोंड ओली होतील. याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेक भागात कांदा काढणीसाठी आला आहे तर, काही ठिकाणी कांदा शेतात काढून ठेवण्यात आला आहे.

गुरुवारी कोकण गोवा परिसरात महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. शुक्रवारी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.