Pune : ठेकेदारांना आता रस्ता ‘वॉरंटी पिरियड’चे बंधन ? 

एमपीसी न्यूज – रस्त्यांच्या कामावरही ठेकेदाराचा आणि कामाचा तपशील द्यावा. असा प्रस्ताव उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यामुळे रस्त्याची कामे नीट झाली नाही तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवले जाणार आहे.

नवीन रस्ते करणे,  जुने रस्ते दुरुस्ती करणे, डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करणे, तसेच फुटपाथ करणे अशी कामे झाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित कामासाठी किती रक्कम खर्ची पडली, या कामाची वर्कऑर्डर कधी दिली, त्याने काम कधी पूर्ण केली आणि देखभाल दुरुस्ती ची मुदत किती तारखेपर्यंत आहे. संबंधित ठेकेदार/एजन्सी चे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक या सगळ्यांची माहिती काम झाल्यानंतर फलकावर लावावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हे काम झाले त्याचे आणि पद विभागाच्या अधिकाऱ्यांची नावही त्यावर नमूद करावे असे या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच ही माहिती पद विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावी असे देखील ठरावात म्हटले आहे.
गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. अनेक छोटे मोठे रस्ते आम्ही बनवतो, काही रस्त्यांची दुरुस्ती करतो, फुटपाथही करतो, मात्र तो रस्ता कधी केला त्याचा वॉरंटी पिरियड काय ? याची काहीच माहिती नसते. त्यामुळे लगेचच रस्ता खराब झाला तर कोणाला जबाबदार धरले जात नाही, केवळ कागदी घोडे नाचवले जातात. संबंधित कामाचा ठेकेदार ती जबाबदारी घेत नाही. कामावेळी आलेले कनिष्ठ अभियंते आणि अधिकारी यांची बदली झाली असे सांगून हात वर करतात. नगरसेवक केवळ उद्घाटनापूर्ते उत्साही असतात. त्यामुळे पुढे या रस्त्यांसाठी अंदाजपत्रकीय तरतूद केली जाते आणि लाखो कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे होऊ नये यासाठी ही माहिती फलक स्वरूपात नागरिकांच्या समोरच राहावी यासाठी हा प्रस्ताव दिल्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.