Pimpri News: ठेकेदार, नागरिकांना महापालिका कार्यालयात ‘नो एंट्री’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, ठेकेदार यांना महापालिका मुख्यालय, विविध विभागीय कार्यालयात ‘नो-एंट्री’ असणार आहे. या प्रवेशबंधीचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. नागरिकांनी ई-मेलद्वारे त्या-त्या विभागाकडे आपल्या तक्रारी कराव्यात, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी संख्या देखील 50 टक्के केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, विविध कार्यालये, विभागीय कार्यालयात अभ्यांगत नागरिकांना अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामधून नगरसेवक, पदाधिका-यांना वगळले आहे. तथापि, बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग, कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश देण्याची व्यवस्था करावी.

अभ्यांगत नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणने, तक्रारी, सुचना या लेखी स्वरुपात ई-मेलद्वारे त्यात-त्यात विभागास पाठविण्यात याव्यात. महापालिका मुख्य इमारत, विविध क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये यांनी त्यांच्याकडील अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात यावेत. करसंकलन विभागीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयातील कर भरणा विषयक कामकाज वगळता महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिक, ठेकेदार आणि इतरांना प्रवेश बंद असणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार लॉकडाउनच्या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट्सअॅपचा वापर ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिक, ठेकेदारांनी महापालिका सेवेशी संबंधिक कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सअॅपचा वापर करावा. या माध्यमांद्वारे प्राप्त अर्ज, निवेदने, तक्रारींबाबत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करुन त्याच माध्यमांद्वारे संबंधितास कळविण्यात यावे, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.