Pune News : अँफोटेरीसिन बी इंजेक्शनचे दर नियंत्रणात आणा – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज –  म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या संसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या अँफोटेरीसिन बी इंजेक्शन्स अतिशय महागडी आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय खते व रसायन खात्याचे मंत्री सदानंद गौडा, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय औषध प्रबंध महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी अँफोटेरीसिन बी इंजेक्शन्सचा वापर केला जातो. ही इंजेक्शन अतिशय महागडे असून त्याची बाजारातील किंमत 7 हजार 900 रुपये इतकी असून साधारणतः 7 हजार 500 रुपयाला मिळत आहे.

एका रुग्णाला किमान 100 इंजेक्शन्सची गरज भासते. त्यामुळे या इंजेक्शनसाठी येणारा प्रचंड खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा आहे, याकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गौडा आणि राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांचे लक्ष वेधले आहे. तसेच केंद्रीय औषध नियंत्रक महानिदेशक (Drugs Controller General of India) व केंद्रीयमंत्री गौडा आणि आरोग्यमंत्री टोपे यांना तातडीने लक्ष घालून अँफोटेरीसिन बी इंजेक्शन्सच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत रेमडिसिविरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी या इंजेक्शनचे वितरण अन्न व औषध विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने रेमडिसिविरच्या वितरणासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होण्यास चाप बसला होता. भविष्यात अँफोटेरीसिन – बी इंजेक्शन्सबाबत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उत्पादनात वाढ करुन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.