Pimpri : टँकरच्या पाणी वाटपाचे दर नियंत्रित करणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी टँकरद्वारे पाणी वाटप केले जाते. टँकरच्या पाणी वाटपाचे दर नियंत्रित करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा अभ्यास सुरु आहे. शहर सुधारणा समितीमार्फत त्याचा प्रस्ताव आणला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) दिली. तसेच अतिरिक्त पाणी वापर करणा-यांवर अधिभार लावण्याचे नियोजित असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पाणीपुरवठ्याच्या निर्णयाबाबत अभ्यासकरुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात कमी पाणीपुरवठा होत होता. त्या भागातील तक्रारी संपल्या आहेत. टाकीचे काम केल्यास काही भागात दुषित पाणीपुरवठा होतो. परंतु, तत्काळ दूषित पाण्याची तक्रार निकाली काढली जाते.

पाणीपुरवठ्याच्या सातत्याने तक्रारी येणा-या दिघी-भोसरीतील कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्याकडील पदभार काढून घेतला आहे. प्रवीण लडकत यांच्याकडे पदभार दिला असून पाणीपुरवठा सुरळित करण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत. शहरातील 95 टक्के भागात प्रेशरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी वापर कमी झाला आहे. ते पाणी दुस-या भागाला दिले जाते.

महापालिकेने महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशनकडे (महाडिस्को) अतिरिक्त वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. अतिरिक्त वीज पुरवठा मंजूर झाल्यास दोन पंप लावले जातील. त्यामुळे रावेत बंधा-यांतून 30 एमएलडी पाणी जास्त उचलण्यात येईल. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणावर नाही, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

दापोडीतील घटनेप्रकरणी जाब-जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु

दापोडीतील दुर्घटनेची द्विसदस्यी समिती चौकशी करत आहे. शहर अभियंता राजन पाटील आणि सह शहर अभियंता श्रीकांत सवणे याची चौकशी करत आहेत. जाब-जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. सल्लागार, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांचा काय सहभाग होता. त्याचा सविस्तर अहवाल आठ दिवसात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.