Dehuroad News : शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण; अभिनेत्री केतकी चितळे, निखील भामरे विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह लिखाण करून पोस्ट केल्याची दोन प्रकरणे सध्या राज्यात सुरु आहेत. ट्विटरवर निखील भामरे नावाच्या अकाउंट धारकाने तर फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हिने हे आक्षेपार्ह लिखाण करून पोस्ट केले आहे. त्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

आशिष सुभाष बंसल (वय 41, रा. देहूरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार @NikhilBhamre8 या नावाने अकाउंट असलेल्या व्यक्ती विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील भामरे या व्यक्तीने त्याच्या @NikhilBhamre8 या ट्विटर अकाउंटवर ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधींसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची’ अशी शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक व जीवे मारण्याच्या धमकीचा मजकूर असलेली पोस्ट केली. राजकीय पक्षामध्ये द्वेषाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप नितीन गोपाळ मोरे (वय 57, रा. देहूगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लेखन केले. संत तुकाराम महाराज हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. तसेच ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. संत तुकाराम महाराजांना जगदगुरू म्हटले जाते.

केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराजांच्या नावाचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लिखाण केले असल्याने वारक-यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.