Hinjawadi : भर रस्त्यात वाहने अडवणा-या वाहतूक पोलिसांना जाब विचारल्यावरून वाद

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलिसांनी भर रस्त्यात वाहने अडवली. त्यामुळे रस्ता अरुंद झाला. पादचारी नागरिकांना रस्त्याच्या मधून चालत जावे लागले. यामुळे वाहतूक पोलिसांना अडवलेली वाहने पुढच्या बाजूला थांबवण्याची विनंती करणा-या नागरिकांसोबत वाहतूक पोलिसांनी हुज्जत घातली. वाहतूक पोलिसांनी नागरिकाच्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. हा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास वाकड पुलाजवळ घडला.

संजय शितोळे यांच्याशी वाहतूक पोलिसांनी हुज्जत घातली. संजय शितोळे म्हणाले, “मी वाकडकडून हिंजवडीच्या दिशेने सकाळी सव्वादहाच्या सुमारास जात होतो. वाकड पुलाजवळ आलो असता वाहतूक पोलिसांनी काही वाहनांना भर रस्त्यात अडवले होते. रस्त्यात वाहने थांबल्यामुळे रस्ता अरुंद झाला. तसेच पादचारी नागरिक रस्त्याच्या मधून चालू लागले. रस्त्याच्या मधून चालल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला.

याबाबत मी वाहतूक पोलिसांना जाब विचारला. तसेच वाहने जरा पुढच्या बाजूला थांबवण्याची विनंती केली. मात्र, वाहतूक पोलिसांनी वाद घातला. माझा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि फोनमध्ये मी काढलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मला हिंजवडी पोलीस ठाण्यात नेले. तिथे तक्रार दाखल करून समज देऊन मला सोडण्यात आले, असेही शितोळे यांनी सांगितले.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले, “वाहतूक पोलीस आणि शितोळे यांचा काही कारणावरून वाद झाला. वाहतूक पोलिसांनी शितोळे यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात आणले. शितोळे यांच्याशी चर्चा केली. सामान्य माणसांना पोलिसांचा त्रास देण्याचा हेतू नाही. किरकोळ शाब्दिक वाद असल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.