Kolhapur News : महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय

पूरस्थितीचा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडून आढावा. Coordination between Maharashtra and Karnataka states to prevent floods.

एमपीसी न्यूज – गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एकत्रित कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट दिली.

यावेळी दोघा मंत्रीद्वयांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत माहिती घेतली. दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

या दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला महापुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी व महाराष्ट्रचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांकडून समन्वय राखला जात असून तो कायम रहावा असेही त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही देण्यात आल्या.

सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून 1.56000 क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. तर, कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून 2.20000 क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.