New Delhi: ‘कोरोनाबाधित’ न्यायमूर्ती अजयकुमार त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकपाल सदस्य व निवृत्त न्यायमूर्ती अजयकुमार त्रिपाठी (वय 62) यांचे निधन झाले. त्यांना शनिवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. महिन्याभरापूर्वी त्रिपाठी यांना कोरोनाची बाधा झाली होती. 

छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावरुन त्रिपाठी निवृत्त झाले होते. लोकपालचे सदस्य असलेल्या त्रिपाठी यांना एप्रिलच्या सुरुवातीला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या हे ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्रिपाठी अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. ते लोकपालच्या चार निवृत्त न्यायाधीश सदस्यांपैकी ते एक होते.

छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्याआधी त्रिपाठी बिहारमध्ये पटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. प्रचंड दबाव असूनही त्यांनी चारा घोटाळा प्रकरणी समोर आलेल्या साक्षी पुराव्यांआधारे न्यायदान करण्यावर भर दिला दिला होता. एक निर्भिड आणि निस्पृह न्यायमूर्ती अशी त्यांची ख्याती होती.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करुन न्या. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल दुःख प्रकट केले आहे. त्रिपाठी यांच्यासोबत आपण फार पूर्वी वकिली करत होतो असे सांगून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही शोक प्रकट केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.