Chikhali News : घरकुलमध्ये आणखी दोन इमारतींत ‘कोरोना केअर सेंटर’ सुरू

एमपीसी न्यूज – चिखली घरकुल येथील डी-5 आणि डी 6 या दोन इमारतीमधील दोन्ही कोरोना सेंटरमध्ये 300 पेक्षा जादा कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. त्यामुळे घरकुलमधील डी-7 आणि डी-8 या दोन  इमारतींमध्येही प्रत्येकी 200 खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 1 कोटी 32 लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हदीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. महापालिका आयुक्तांच्या 19 मार्च रोजीच्या प्रस्तावानुसार चिखली घरकुल येथील डी – 5 आणि डी -6 या दोन इमारतींमध्ये 200 खाटांचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या बालनगरी येथील कोरोना केअर सेंटर, ऑटो क्लस्टर येथील जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू आहे. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय 200 खाटांसाठी सुरू करण्यात आले आहे.

सध्या चिखली घरकुल येथील डी-5आणि डी-6 या दोन इमारतींमधील दोन्ही कोरोना सेंटरमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत घरकुल येथील दोन सेंटर 50 टक्के भरल्यानंतर दुस-या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करावे, असा निर्णय झाला. त्यानुसार घरकुल येथील दोन डी-7 आणि डी-8 या दोन इमारती दोन  महिन्यांसाठी तातडीने सुरू करण्यावाबत अतिरिक्त आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.

आयकॉन हॉस्पिटल यांना 7 ऑगस्ट 2020 रोजी एका इमारतीतील 200 खाटासाठी  प्रतिदिन प्रतिखाट 543 रुपये या दराने कामाचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने 15 ऑक्टोबर 2020 रोजी या इमारतीमधील कोरोना केअर सेंटर बंद करण्यात आले होते. त्यासाठी आयकॉन हॉस्पिटल यांना 26 मार्च रोजी पत्र देऊन जुन्या दराने काम करण्यास तयार आहात किंवा नाही, याबाबत विचारणा करण्यात आली.

त्यांनी जुन्या दराने काम करण्यास तयार असल्याचे कळविले आहे. त्यानुसार 27 मार्च ते 26 मे 2021 या दोन महिने कालावधीसाठी कोरोना केअर सेंटर चालविण्यास देण्याबाबत कामकाजाचे आदेश देण्यात आले आहेत. एका इमारतीसाठी 66 लाख 24 हजार रुपये खर्च होणार आहे. दोन इमारतींसाठी 1 कोटी 32 लाख 49 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.