Corona Crisis: लॉकडाऊन…मध्यमवर्गीयांना पडलेलं एक दुःस्वप्न

Corona Crisis: Lockdown ... a nightmare for the middle class written by shripad shinde शासनाने कर्मचा-यांचे पगार देण्याचे कंपन्यांना आवाहन केले. पण शासनाच्या आवाहनाकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करणे, ही तर आपली परंपरा आहे.

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे)– सध्याच्या काळात कोरोना, लॉकडाऊन, क्वारंटाईन हे शब्द सबंध देशभर दररोज कित्येक वेळेला चर्चिले जातात. त्यात बंद पडणारी कार्यालये, कंपन्या, व्यवसाय आणि त्यामुळे जाणाऱ्या नोकऱ्या, बेरोजगारी, आर्थिक संकट, मध्यमवर्गीयांचे हाल याचीही जोड त्या चर्चेला मिळते. यावर लॉकडाऊन उठवून आर्थिक घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्याशिवाय सध्या तरी दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. पण लॉकडाऊन उठल्यानंतर लगेच सगळं काही पूर्वीसारखं आणि आनंदी आनंद होईल असंही नाही. त्यासाठी निश्चितच काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. त्यानंतर सर्व बाबी पूर्वपदावर येणार आहेत. पण लॉकडाऊनच्या काळात ज्या लोकांचं हातावर पोट आहे, दररोज मजुरी किंवा काम केल्याशिवाय भाकरीची सोय होत नाही असा मध्यम आणि निम्न मध्यमवर्ग प्रचंड हाल सोसत आहे.

कोरोना साथीने जगभर थैमान घातले आहे. याचा संपूर्ण जगावर दूरगामी विपरीत प्रभाव पडला आहे. विश्व कवेत घेण्यासाठी निघालेल्या नामी उद्योग समूहांनी कोरोना साथीपुढे नांगर टाकला आहे.

राज्य शासन, केंद्र शासन त्यांच्या पातळीवरून मोठमोठ्या रकमेच्या तरतुदी करीत आहे. जाहीर केलेले पैसे प्रत्येक व्यक्तीला वाटले तरी प्रत्येक व्यक्ती लखपती होईल, एवढा पैसा सरकारने लॉकडाऊनच्या काळात विविध योजना आणि मदतीच्या रूपाने दिला. पण तो प्रत्येकापर्यंत किती आणि कसा पोहोचला, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

असो, राज्य आणि देशपातळीवर चालणाऱ्या घडामोडींचा आढावा घेण्याऐवजी स्थानिक पातळीवर काय चाललंय, ग्राउंड रिपोर्ट किंवा समाजातील खरी परिस्थिती काय म्हणतेय हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.

पुण्यातील माझ्या बघण्यातील एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. कोरोना साथ आली आणि देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. कंपन्या बंद झाल्या. या कंपनीत घरून काम करणे शक्य नसल्याने काम आणि पगार पूर्णतः बंद झाले.

शासनाने कर्मचा-यांचे पगार देण्याचे कंपन्यांना आवाहन केले. पण शासनाच्या आवाहनाकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करणे, ही तर आपली परंपरा आहे. त्यामुळे आर्थिक मंदी आणि अन्य कारणे देऊन कंपनीने पगार देण्यास नकार दिला. दरम्यान, काही रक्कम देऊन कर्माचाऱ्यांची बोळवण केली, हे सुद्धा सांगावं लागेल.

तर यामध्ये घरातील कमावता हात थांबला. घरातील महिला खासगी क्लास घेत असल्याने काही पैसे शिल्लक होते. त्यात कसेबसे काही दिवस चालले. मुलाचे शिक्षण आणि अन्य खर्च नियमितपणे भागत असल्याने अन्य मोठी बचत करता आली नाही.

याचा परिणाम असा झाला की, त्या कुटुंबातील महिला आणि मुलगा घराबाहेर पडले. त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. दररोज भाजी विक्री करून उदरनिर्वाह करण्याशिवाय कुटुंबावर पर्याय राहिला नाही. चार भितींमध्ये आनंदाने राहणारे हे कुटुंब कर्त्या माणसाची नोकरी गेल्याने रस्त्यावर आले.

ही अवस्था एकाच कुटुंबाची आहे, असे नाही. माझ्या ओळखीतले आणखी एक कुटुंब आहे. हे कुटुंब देखील पुण्यातलेच. त्यांचे घर शहराच्या मध्यवस्तीत होते. कुटुंब प्रमुख व्यक्ती एका कंपनीत कामाला होती.

मागील दोन वर्षांत जागतिक आर्थिक मंदी आली आणि त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्या कुटुंबाने मध्य वस्तीतले घर विकून येतील तेवढ्या पैशांमध्ये शहराच्या कोपऱ्यावर कुठेतरी छोटीशी जागा घेऊन तिथे काही किरकोळ व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन सुरु करता येईल, असा निर्णय घेतला. काही दिवसातच त्यांचे घर विकले गेले. कारण माणसाची अधोगती ही यशापेक्षा खूप लवकर होते.

घर विकल्यानंतर या कुटुंबाने शहराच्या कडेच्या भागात रोजीरोटी सुरु केली. घरातच साडीचे दुकान सुरु केले. यातून त्यांची गुजराण होऊ लागली. मुलाचे शिक्षण, घरखर्च याचीही मोठी कसरत या कुटुंबाला करावी लगत होती.

पण शेवटी व्हायचं तेच झालं. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यांचे दुकान बंद झाले. मुलाची फी, घरातील खर्च, दवाखाना यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत, अशी या कुटुंबाची सध्या अवस्था आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते कुणाला जास्त बोलतही नाहीत. अशी अवस्था लॉकडाऊनने केली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांनी घरची जबाबदारी घेतलेली असते. मिळेल ते काम, नोकरी, छोटा-मोठा व्यवसाय करून ती जबाबदारी पार पडण्यासाठी या तरुणांनी गाव सोडलेले असते. पण शहरात आलेल्या लाखो तरुणांची लॉकडाऊनमुळे घोर निराशा झाली आहे.

माझा एक मित्र आहे. त्याचे कुटुंब देखील मध्यमवर्गीय आहे. त्याची शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करण्याची इच्छा होती. घरच्यांनी देखील आपली सगळी स्वप्न त्याच्यात पाहिली आणि त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला.

पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याला घरच्यांनी संमती दिली आणि त्याने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गाव सोडले.

गाव सोडून मित्र पुण्यात आला. अभ्यास करू लागला. दर महिन्याला घरचे पैसे पाठवत होते. मित्रही त्याला लागेल तेवढेच पैसे खर्च करत आणि शिल्लक पैशांमधून अभ्यासाचे साहित्य खरेदी करत असत.

दुसऱ्या प्रयत्नात तो एमपीएससीची पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा पास झाला. पण मुलाखतीत गावंढळपणाने मार खाल्ला. त्याची इच्छाशक्ती आणखी वाढली. अभ्यासाचे नियोजन बदलले, अभ्यासाचे तास वाढले, जोर आणखी वाढला.

दरम्यान, घरची आर्थिक अवस्था बिकट होत होती. तरीही घरचे त्याला पैसे पाठविण्यासाठी कमी पडत नव्हते. घरच्यांनी त्यांच्या अडचणी त्याच्याजवळ कधीच सांगितल्या नाहीत. ही बाब त्याच्या लक्षात आली. त्याची सगळी स्वप्ने ताडकन तुटून पडली.

लगेच त्याने काहीतरी काम सुरु करून घरच्यांना आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला. आर्थिक समीकरणे गावाकडच्या पोरांची आयुष्यं एका तडाख्यात बदलून टाकतात, हे त्याचे एक जिवंत उदाहरण मी स्वतः बघत आहे.

काम करण्यासाठी मित्राने कुठलीही लाज बाळगली नाही. एका डिलिव्हरी कंपनीत तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागला. तिथेही तोच उत्साह. सकाळी लवकर निघून रात्री उशिरापर्यंत काम करू लागला.

पुण्यासारख्या शहरात सुरुवातीला सायकलवरून डिलिव्हरी देता-देता त्याने स्वतःची दुचाकी घेतली. घरच्यांना दर महिन्याला पैसेही पाठवू लागला. घरच्यांना आपण आधार देतोय, याचे त्याला समाधान होते. पण लॉकडाऊनमध्ये त्याचे काम गेले आणि कामासोबत त्याचा आनंदही गेला.

तो गावाकडे गेला. गावाकडे जाऊन त्याने शेतातली कामे सुरु केली. आता पुण्यासारख्या शहरात कधीच न जाण्याचा त्याने निर्णय घेतलाय. कारण शहरात आयुष्य क्षणात बदलतं, हे त्याच्या लक्षात आलंय. कोरोनाने त्याला हे दाखवून दिलंय. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत.

काही तरुण नोकरी नाही, आर्थिक चणचण आणि ताण यातून डिप्रेशनमध्ये गेले आहेत. कॉलेजमध्ये शिकणारी पोरं आत्तापासूनच अनेक कंपन्या, कार्यालयांचे ऑनलाईन उंबरठे झिजवत आहेत.

फोन आणि इंटरनेटवरून कुठे काही काम मिळतंय का, याची चाचपणी केली जात आहे. मागच्या आठवड्यात एकाचा फोन आला. त्याने टायपिंगचे पूर्ण शिक्षण घेतले आहे. स्वतः मराठी सारख्या विषयात एम.फील आहे. त्याने काहीतरी काम मिळेल का? अशी विचारणा केली. काहीही टायपिंगचे काम असेल तर प्लीज सांग म्हणून त्याने आवर्जून सांगितले.

फ्रीलान्सिंगचा प्रकार कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. टायपिंगची कामे, अकाउंटिंगची कामे यातून केली जात आहेत. काही कंपन्या आता सुरु झाल्या आहेत. पण कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने कामगार जीव मुठीत घेऊन कामावर जात आहेत.

कामाच्या ठिकाणी कोरोनाबाबत सर्व नियम पाळलेले असतील तर ठीक. नाहीतर कामाच्या ठिकाणीही धोका आणि येता-जाता प्रवासातही धोका. त्यात आतातरी पूर्ण पगार मिळेल का? ही चिंता अजूनही कायम आहे. असे चहूबाजूंनी कामगारांचे हाल होत आहेत. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आत्ताची ही जीवघेणी कसरत सुरु आहे.

गावाकडची पोरं अजून किमान एक-दोन वर्ष तरी पुण्या-मुंबईसारख्या शहराकडे येण्याचं नाव घेणार नाहीत. कारण इथे येऊन जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा गावात आहे त्या अवस्थेत राहिलं तर काय वाईट आहे, असं माझा एक मित्र सांगतो. सध्या नोक-या नसल्या तरी येणा-या काळात नोक-या तयार होतील. पण त्यासाठी मनुष्यबळ मिळणार नाही.

माझ्या एका नातेवाईकाने पुण्यात एका बहुमजली इमारतीमध्ये घर घेतलं आहे. इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे. पझेशनची तारीख येऊन दोन महिने लोटले पण अजूनही काम पूर्ण नसल्याने त्याला स्वतःच्या घरात राहायला जात येत नाही.

कारण बांधकाम व्यावसायिकाला मजूरच मिळेनासे झालेत. जे मजूर कामावर आहेत, ते सकाळी अकरा वाजता येतात आणि चार वाजता तर घरी निघून जातात. त्यात जेवणाची सुट्टी आणि अन्य विरंगुळा, यात कामच होत नसल्याचे तो बांधकाम व्यावसायिक सांगत होता.

ही अवस्था मजुरांच्या बाबतीत आहे. पण अशीच थोड्या अधिक फरकाने अन्य क्षेत्रात देखील कामगारांच्या बाबतीत आवश्यकता आहे.

पण हे म्हणजे ‘जेंव्हाचे गहू, तेंव्हाच्या पोळ्या’ असे आहे. सध्या अनेकजण भरडले जात आहेत. आर्थिक तंगी हेच एक कारण सगळ्यांच्या समोर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत.

ठिकठिकाणी रोजगार मेळावे भरवून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. पण हे सध्याच्या काळात तरी काही प्रमाणात शक्य नाही. त्यामुळे कोरोनावर औषध येण्याची, लॉकडाऊन उघडण्याची, भीती संपण्याची वाटच पहावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.