Corona Death : कोरोनाचा कहर; एका दिवसात 50 डॉक्टरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मागील वर्षापासून जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा माठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृतांचे प्रमाण वाढले आहे, आणि त्यात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनाही आपले जीव गमवावे लागले आहे.

एनडीटीव्हीला इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण 244 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. तर रविवारी (दि. 16) एकाच दिवशी 50 डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी 736 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू बिहार (69), उत्तर प्रदेश (34) आणि दिल्लीत (27) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचे लसीकरण झाले होते.

देशात लसीकरण मोहीम सुरु होऊन पाच महिने झाले आहेत. मात्र अद्यापही 66 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी 50 डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 244 डॉक्टरांनी जीव गमावणं आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे”.“डॉक्टरांची संख्या कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. कधी कधी तर विश्रांती न घेता ते सलग 48 तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत असून लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन कोरोनामुळे एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाले असल्याचे सांगत असताना ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून फक्त त्यांच्या साडे तीन लाख सदस्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो, मात्र भारतात 12 लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.