Corona Effect : पतसंस्थांच्या दैनंदिन बचत प्रतिनिधींवर उपासमारीची वेळ

Corona Effect: Time of starvation on the daily savings representatives of credit societies

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसूली व दररोज होणारी दैनंदिन बचत ठेव थांबल्याने मावळ तालुक्यातील 50 नागरी सहकारी पतसंस्थेतील दैनंदिन बचत प्रतिनिधीवर उपासमारीची वेळ आली आहे. सहकारी पतसंस्थांची वसुली थांबल्यामुळे पतसंस्थांनाही आर्थिक चणचण भासू लागली असून काही पतसंस्थांना लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने अनेक छोटे- मोठे व्यावसायिक व दुकानदार, भाजीपाला, हाॅटेल  व्यावसायिक पतसंस्थांकडून कर्ज घेतात. कागदपत्रे पाहून पतसंस्था लाखो रूपयांचे कर्जपुरवठा करतात.बचतप्रतिनिधीमार्फत  (एजंट) दररोज पैशांचे कलेक्शन करून पतसंस्था कर्ज वसुली करत असतात. यातूनच बचतप्रतिनिधींला कमिशन दिले जाते. याशिवाय कर्ज, ठेवी, दामदुप्पट योजनां  पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिल्या  जातात.

कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसायात मंदी आलेली आहे. त्यामुळे दररोज होणारे कलेक्शन थांबले आहे. यामुळे बचतप्रतिनिधीसह पतसंस्थेचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. गेल्या मार्च पासून म्हणजे जवळ जवळ चार महिन्यांपासून दररोज होणारे कलेक्शन (दैनंदिन ठेवी) थांबले आहे.

त्यामुळे व्यावसायिकांची कर्जमागणी मंदावली आहे. शिवाय ठेवीदारांचे पैसेही देण्यासाठी पतसंस्थांकडे पैसे शिल्लक नाहीत. अशी परिस्थिती कायम राहिल्यास   पतसंस्थेच्या 2020- 2021 या आर्थिक वर्षात पतसंस्था अडचणीत येऊ शकतात. पतसंस्था सुस्थितीत येण्यासाठी काही कालावधी जाणार असल्याने भाडे, कर्मचारी पगार, वीजबील, कर्जदारांकडून थांबलेली वसुली, ठेवीदारांची देणी यासाठी सरकारने पतसंस्थांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज तालुक्यातील पतसंस्था चालक व्यक्त करू लागले आहेत.

 बचत प्रतिनिधींवर उपासमारीची वेळ

पतसंस्थेमार्फत अनेक बचतप्रतिनिधी दैनंदिन बचत ठेव खाते चालवतात. दुकानदारांना दिलेले कर्जही दररोजच्या कलेक्शनमधून वसूल करतात यामधून पतसंस्था त्यांना कमिशन देत असते. आता पतसंस्थेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी तालुक्यातील  विविध पतसंस्थांतील बचतप्रतिनिधीवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे.

‘पतसंस्था आणि दैनंदिन बचत प्रतिनिधी वाचण्यासाठी शासनाने काळजी घ्यावी’
मावळ तालुक्यात एकूण 50 सहकारी  पतसंस्था कार्यरत आहेत सध्या माेठया प्रमाणावर दैनंदिन बचत ठेव कमी झाली आहे. कोराेनाच्या काळात अनेक वेळा लाॅकडाऊन हाेत असल्यामुळे बचत प्रतिनिधींना पैसे गाेळा करावयास अनेक अडचणी येत आहे. सध्या संस्थामध्ये माेठ्याप्रमाणावर ठेवी असून त्यांना मात्र व्याज द्यावे लागत आहे.  शासनाच्या आदेशाने मात्र कर्जवसुली थाबंलेली आहे. या सर्व कारणांमुळे पतसंस्था या आर्थिक वर्षात अडचणीत येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. शासनाने या सर्व बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे दैनंदिन बचत प्रतिनिधी यातून कसा वाचेल, याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.
 – संदीप वाळुंज
व्यवस्थापक, पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था, तळेगाव दाभाडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.