Corona News : महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये कोरोना वाढीचा वेग 10 टक्क्यांच्या पुढे

एमपीसी न्यूज – देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीवर केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र ओडीशा, तामिळनाडू आणि तेलंगणा यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या राज्यांमध्ये साप्ताहीक रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.

या पत्रात भूषण यांनी म्हंटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पात्र असलेल्या लोकांच्या लसीकरणाची गती वाढवणे आणि कोरोना रोखण्यासाठी पाच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एक पत्रक जारी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आगामी काळात विविध उत्सवांसाठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण वाढ होऊन मृत्यूमध्ये वाढ होऊ शकते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 19 हजार 406  नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी 0.31 टक्के सक्रीय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50  टक्के आहे.

गेल्या 24 तासांत सक्रीय कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 571 प्रकरणांची घट नोंदविण्यात आली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर 4.96 टक्के नोंदविला गेला आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 4.63 टक्के होता, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.