Lockdown Effect News : वल्लभनगर आगारातील बस सेवा ठप्प; पंधरा दिवसात एकही एसटी धावली नाही

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावले असून नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक कारण असलेल्या नागरिकांना व सेवेतील कर्मचारी यांना प्रवासास मुभा आहे. परंतू, प्रवासीच नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून गेल्या पंधरा दिवसापासून एकही बस फेरी झाली नसल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना एसटी मार्फत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडायला तयार नाहीत. अत्यावश्यक कारणासाठी गरज पडल्यास नागरिक खासगी वाहनांचा उपयोग करत आहेत. यामुळे एसटीला प्रवासीच मिळत नाहीत. वल्लभनगर आगारातून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू केल्यापासून एकही बसफेरी झाली नाही.

एसटीला संचलन करण्यासाठी किमान पंधरा प्रवाशांची आवश्यकता असते. मात्र, एकाच मार्गावरील पंधरा प्रवासी मिळणे लॉकडाउनच्या काळामध्ये अवघड झाल्याने एकाही बसला मार्गावर संचलन करता येत नाही. कमी प्रवाशावर संचलन केल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड एसटी महामंडळाला बसतो.

आधीच्या लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. यामध्ये आता परत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसरा लॉकडाऊन जाहीर केल्याने एसटी महामंडळाची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून जुन्नरला टपाल वाहतूक करणारी बस सोडल्यास एकही प्रवासी बस वल्लभनगर आगारातून सोडली गेली नसल्याची माहिती स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.