Corona India Update: गेल्या 24 तासांत देशात 6387 नवे रुग्ण, एकूण संख्या दीड लाखांवर

corona india update in last 24 hours 6387 new coronavirus affected patient found total count more than one lakh 50 thousand

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सलग सहाव्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 6387 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 767 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 4337 इतकी झाली आहे.

देशात कोरोनाचे 83 हजार सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, 64 हजार 425 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते मार्चमध्ये 7.1 टक्के होते. तर आता ते 41.6 टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती मंगळवारी (दि. 27) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगभरात सर्वांत कमी असून ते 3.3 टक्क्यांवरुन 2.87 टक्क्य़ांवर आलेले आहे. तर जगभरात मृत्यूचे सरासरी प्रमाण 6.4 टक्के आहे. रुग्णांचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे. जगभरात एक लाख लोकांमध्ये करोनाचे 69.9 रुग्ण आहेत. तर भारतात केवळ 10.7 रुग्ण आढळले आहेत. देशातील एक लाखामागे मृत्यूचे प्रमाण 0.3. तर जगात हे प्रमाण 4.4 आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण आश्चर्यकारकरित्या कमी आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असली तरी त्याबाबत निष्कर्ष काढता येत नाही. बीसीजी लस, प्रतिकारशक्ती अधिक असणे वगैरे अनेक मुद्दे सांगितले जात आहेत. पण हे निव्वळ अंदाजच आहेत. मात्र, खूप आधीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यावर भर देण्यात आला. रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. या प्रतिबंधात्मक उपायांमुळेही भारतात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे मत केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.