India Corona Update : कोरोनामुळे देशात 2 लाख मृत्यू, गेल्या 24 तासांत 3,293 रुग्ण दगावले 

एमपीसी न्यूज – भारतात मागील काही दिवसांपासून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत दोन लाख रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 293 रुग्ण दगावले असून, उच्चांकी 3 लाख 60 हजार 960 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 162 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 82.33 टक्के एवढा झाला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 29 लाख 78 हजार 709 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह सात राज्यात देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

मागील 24 तासांत 3 हजार 293 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 01 हजार 187 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 28 कोटी 27 लाख 03 हजार 789 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 23 हजार 912 चाचण्या मंगळवारी (दि.27) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 14 कोटी 78 लाख 27 हजार 367 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. देशात एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. लसीसाठी 18 ते 45 वयोगटातील सर्वांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरण नोंदणीसाठी आज (बुधवार, दि.28) दुपारी चार वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.