Corona News : ‘कोरोना’ एक साल बाद – व्हाया टाळेबंदी

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – भारतातील कोरोना एक वर्षाचा झाला. या एका वर्षाच्या पाहुण्याने सर्वांना पार मेटाकुटीला आणले. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक चर्चा कोरोनावर येऊन थांबते. कोरोनाला घालवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करून झाले. पण कोरोना काही जायचं नाव घेईना. तेंव्हा आत्मपरीक्षण केल्यावर वाटतं की, आपलंच काहीतरी चुकतंय. पद्धतशीरपणे कोरोना संपवण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्च 2020 रोजी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या घटनेला आज एक वर्ष झाले. एक वर्षानंतर टाळेबंदी शिथिल झाली पण कोरोना लाखो पटींनी वाढला आहे. देशात कोरोना सदृढ का झाला, हा साधारण प्रश्न देशातील प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

‘मी ह्याची जिरवीन, मी त्याची जिरवीन, माझा नाद करू नका, खूप महागात पडेल’ आजवर अनेक वाचाळवीरांच्या अशा अनेक धमक्या ऐकल्या. पण ‘कोरोना’ नावाच्या पठ्ठयाने ह्या वाचाळवीरांनाच नाही तर संबंध जगाला दाखवून दिलं की, ‘माझा नाद करू नका, खूप महागात पडेल’.

आपण किती सजगतेने वागतोय, यावर कोरोना विरुद्धच्या लढाईचा निकाल अवलंबून आहे. काटेकोर काळजी घेतली तर कोरोना हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. पण हलगर्जीपणा झाला, तर कोरोना कडेवर बसून घरी आल्याशिवाय राहणार नाही, हे एव्हाना संपूर्ण मानवजातीला कळून चुकलं आहे.

26 डिसेंबर 2019 रोजी चीनच्या वुहान शहरात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. केरळ राज्यातून कोरोनाने भारतात प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आढळला. चीन आणि इतर देशात सुरु असलेला कोरोनाचा कहर ऐकत, वाचत आणि पाहत असल्यामुळे कोरोना थेट आपल्या शहरात आल्याचे समजताच अनेकांना धडकी भरली.

दुस-याच दिवशी (11 मार्च) राज्यातील बससेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली. त्यानंतर (12 मार्च) प्रवासी वाहतूक करणारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली. 13 मार्च रोजी राज्यात महामारी रोग अधिनियम 1897 कायदा लागू करण्यात आला. 17 मार्च रोजी मुंबई मधील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता.

शासनाने प्रथम जमावबंदी जाहीर केली. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली. पण याचा कोरोनाला काही फरक पडला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात टाळेबंदीची घोषणा केली. या घोषणेमुळे राज्याच्या, जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या. प्रत्येकजण जिथे आहे तिथे अडकला. उद्योगांची चक्रे थांबली. सवयीची वाटणारी उद्योगांची घरघर थांबल्याने शहरांमध्ये भयाण शांतता पसरली.

अत्यावश्यक सेवा आणि पोलीस हेच फक्त रस्त्यावर दिसू लागले. एखादा घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलाच, तर पोलीस त्याला काठीचा प्रसाद देत होते. 24 मार्च रोजी देशांतर्गत प्रवासी विमानसेवाही बंद करण्यात आली. तोपर्यंत कोरोनाने जनसंपर्क वाढवला होता. समूहसंसर्ग न होऊ देण्यासाठी प्रशासन शक्य तेवढा प्रयत्न करत होते. पण नको तेच झाले. काहीच दिवसात कोरोनाचा समूह संसर्ग झाला.

टाळेबंदीमुळे देशातील सर्वांचे जीवनचक्र बदलले. मोलमजुरी करणा-यांचे काम बंद झाल्याने रोजच्या रोज मिळणारी मजुरी बंद झाली. अनेक नोकरदार नोकरी गमवून घरी बसले. काहींनी घरून कामाला सुरुवात केली. कोरोना महिन्या-दोन महिन्यात जाईल आणि त्यानंतर परिस्थितीत पूर्वपदावर येईल, असा प्रत्येकाने अंदाज बांधला आणि टाळेबंदीची मजा घेऊ लागला.

पण पंतप्रधानांनी दुसरी, तिसरी, चौथी टाळेबंदी जाहीर केली आणि लोकांची टाळेबंदी मधील मजा हळूहळू कमी व्हायला लागली. सुरुवातीला खिशात खुळखुळणा-या पैशांची खुळखुळ आता थांबली होती. इनकमिंग पूर्णतः बंद आणि आउटगोइंग मात्र सुरूच होतं, त्यामुळे अनेकांना रोजच्या जगण्याची चिंता सतावू लागली.

टाळेबंदीच्या काळात अनेकांनी आपल्या आवडी, कला जोपासल्या. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून करणं शक्य नसेल ती कामे आणि छंद या काळात अनेकांनी जोपासले. वाचन, चित्र काढणे, रंगवणे, परसबाग तयार करणे, तिची डागडुजी, घराची स्वच्छता आणि इतर अनेक छंद लोकांनी जोपासले.

परराज्यातून आलेले कामगार मिळेल त्या मार्गाने आपल्या घराकडे निघू लागले. रस्त्यात दिसल्यावर पोलीस मारतात म्हणून रानावनातून, रेल्वे मार्गावरून लोक जायला लागले. रेल्वे मार्गावरून जाणा-या काही कामगारांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यूही झाला. तरीही घराची ओढ संपत नव्हती. कामगारांची घराच्या दिशेने पायपीट सुरूच होती. 68 दिवस संपूर्ण टाळेबंदीत गेले. त्यानंतर टाळेबंदीमधून काही प्रमाणात शिथिलता मिळायला लागली. एक-एक आस्थापना, कंपन्या, कार्यालये सुरु झाली. अनेकांचा जीव भांड्यात पडला.

टाळेबंदीमधून सवलत देताना मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचा विसर पडू न देण्याचे आवाहन प्रशासनाने केले. पण ऐकतील ते नागरिक कसले. प्रशासनाने केलेल्या आवाहनांना आणि नियमांना फाट्यावर मारून लोकांनी आपले जनजीवन सुरळीत करण्याचा घाट घातला.

इथेच घोळ झाला आणि निघून जाणारा कोरोना पुन्हा वाढू लागला. हजारोंच्या संख्येने दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. एक साल बाद कोरोना पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त वेगाने पसरू लागला आहे. देश पुन्हा एकदा टाळेबंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. यावेळची टाळेबंदी सरकार आणि नागरिक कुणालाही परवडणारी नसेल. त्यामुळे आता तरी आपण नियम पाळणार आहोत का ? की ‘हर फिक्र को धूए में उडाता चला गया’ असंच म्हणणार आहोत, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.