Corona News : धक्कादायक ! ब्रिटनमधील नव्या कोरोनाचे भारतात सहा रुग्ण; आतापर्यंत 16 देशांमध्ये शिरकाव

एमपीसीन्यूज : जगभरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असल्याचे चित्र असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाने संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे.   कोरोनाच्या या नवीन विषाणूने आता जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत 16 देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या या नव्या विषाणूने आता भारतात शिरकाव केला असून देशात अशा प्रकारच्या सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध केला आहे. तरीही या नव्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे.

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या.

यात 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.  त्याचे नमुने देशातील 10  प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले.

यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला.  तर, हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला.

एकूण सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आला असून या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

तसेच या सहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू आरोग्य यंत्रणांकडून सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, ब्रिटनहून मायदेशी परतलेल्या व दिल्ली विमानतळावर उतरलेल्या एका 47 वर्षीय महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, ही महिला आरोग्य यंत्रणेला गुंगारा देऊन पसार झाली.

ती रेल्वेने आंध्र प्रदेशात पोहोचली. त्यावेळी ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दिल्ली ते आंध्र प्रदेश रेल्वे प्रवासात तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.