Pimpri News: कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर; लक्षणे दिसताच तपासणी करा

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना संसर्ग कमी झाला आहे. पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले असून ते आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. तसेच दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गेल्या आठ महिन्यात शहरातील 90 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील सुमारे 87 हजार जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख  नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड)  विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ते सक्षम आहेत. झोपडपट्टी भागातील सर्वाधिक म्हणजेच  37.8 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नसेल. पण, काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश येत आहे. सप्टेंबरपासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात शंभरच्या आत रुग्णसंख्या आली होती. दिवाळी काळात बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. ऋतुमानामध्येही बदल झाला आहे. हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. लक्षणे दिसताच तत्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

लक्षणे आढळल्यानंतर नागरिकांनी त्वरित औषधोपचार केल्यास कोरोना आटोक्‍यात येऊ शकतो. परंतु, अनेक जण त्रास जास्त वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे त्यांना ऑक्‍सिजन व प्रसंगी व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासते. अशा वेळी धोका वाढण्याची शक्‍यता असते, असेही त्यांनी सांगितले. हिवाळ्यात रुग्णसंख्या वाढली तर सुरक्षितता म्हणून आयसीयू व ऑक्‍सिजनयुक्त यंत्रणा सज्ज ठेवलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III