Pimpri : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांच्या वतीने ‘कोरोना निवारण महाअभियान’

'Corona Prevention Campaign' by Rashtriya Swayamsevak Sangh and other organizations to curb the spread of corona virus.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सोयी करिता तसेच महापालिकेला सहकार्य करण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव, नवरात्र उत्सव मंडळे, महिला बचत गट, व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, तरुण मंडळे व ग्रुप्स, जेष्ठ नागरिक संघटना यांच्या प्रत्यक्ष सहभागाने करोना निवारण महाअभियान राबविण्यात येणार आहे.

या संदर्भात 30 जुलै रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व सहाय्यक आयुक्त अजित पवार यांच्यासोबत शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व अन्य संस्थांच्या प्रतिनिधींची पालिका मुख्यालयात बैठक झाली.

चर्चेदरम्यान सद्यस्थितीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिका करत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता येणा-या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

वर्दळीच्या ठिकाणी असणा-या व्यापा-यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मास स्क्रीनिंग करणे, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत, कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी मदत, कोविड रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यासाठी Data Entry Operators पुरविणे या चार प्रकारच्या कामांसाठी पालिकेला मनुष्यबळाची व इतर संसाधनांची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समन्वय समितीकडून वरील चार प्रकारांसह काढा वाटप करणे, कोविड केअर केंद्र संचालन करणे, स्थानिक पातळीवर आरोग्य समितीची स्थापना करण्याचे काम केले जाणार आहे.

वरील सर्व प्रकारच्या कामांसाठी मदत करणा-या एकूण 200 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ओळखपत्राचे महापालिकेकडून वाटप केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष अभियानाला सुरुवात होईल.

# मास स्क्रीनिंग – शनिवार (दि. 8) आणि रविवार (दि. 9) रोजी मास स्क्रीनिंग केली जाईल.

ही स्क्रीनिंग पिंपरी कॅंप (भाजी मंडई), चिंचवडगाव (भाजी मंडई), चिखली (थरमॅक्स चौक ते कस्तुरी मार्केट ते साने चौक), थेरगाव (16 नंबर, डांगे चौक), काळेवाडी (पिंपरी पूल ते काळेवाडी फाटा मार्केट), भोसरी (PMT चौक), मोशी (भाजी मार्केट) इत्यादी ठिकाणी केली जाणार आहे.

# अंत्यविधी – सांगवी, चिंचवड, भोसरी, निगडी या ठिकाणच्या विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांना मदत केली जाणार आहे.

# काढा वाटप केंद्र – (आयुष मंत्रालयाने सुचविलेला) शहरातील सर्व महापालिका प्रभागात सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी प्राथमिक नियोजनानुसार सुमारे 21 ठिकाणी काढा वाटप केंद्रे 8 ऑगस्ट पासून पुढील एक आठवड्यापर्यंत सुरु राहतील.

# जेष्ठ नागरिक प्रबोधन अभियान – शहरातील सर्व महापालिका प्रभागात हे अभियानही राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य समिती मार्फत त्या त्या भागातील जेष्ठ नागरिकांची यादी प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क करणे.

त्यांना आवश्यक ते प्रबोधन व समुपदेशन करणे, तसेच आवश्यक औषधे पुरविण्याचे काम केले जाणार आहे. हे अभियान 8 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.

# कोविड केअर सेंटर – संघाच्या पुढाकाराने महापालिकेच्या सहकार्याने शहरात एक केंद्र सुरु करण्यात येईल व त्याचे संचालन करण्यात येईल. या अभियानाचे प्रमुख म्हणून संघाचे शहर सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे, तर अभियान सह प्रमुख म्हणून विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते नितीन वटकर व कुणाल साठे हे काम पाहणार आहेत.

मार्च ते जून या चार महिन्यात संघाकडून कोरोना काळात केलेली कामे –

# शहरातील गरजू नागरिकांना 71 हजार 388 जणांना दोन वेळचे घरपोच जेवणाचे डबे, चार हजार 870 धान्य किट्स, तसेच अन्नछत्रात 89 हजार 961 जणांना दोन वेळचे भोजन, असे एकूण एक लाख 45 हजार 449 नागरिकांना पर्यंत अविरत सेवा पोचवली.
# नागरी वस्तीत शेतकरी ते सोसायटी या योजने अंतर्गत सुमारे 104 मोठ्या हौसिंग सोसायट्यामध्ये ताजा भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
# स्थलांतरित श्रमिक नोंदणी व डेटा एन्ट्री करीता शहरातील पोलीस प्रशासनाला स्वयंसेवकांनी मदत केली. तसेच अडकलेले जे श्रमिक होते त्यांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.
# गो शाळेला अडचण होत असल्याने त्यांना चारा पुरवण्यात आला
# लघु उद्योग भारती या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी तसेच उद्योगांची मनुष्यबळ कमतरता यांना पूरक असे जोडणीचे कार्य हाती घेण्यात आले

कोरोना संकटावर मात करण्यासाठी, नागरीकांना सेवा पुरविण्यासाठी शहरातील नागरिक, मंडळे आणि संस्थांनी एकत्र येऊन लढा द्यावा.

कोरोनावर मात केलेल्या नागरिकांनी इतर कोरोना ग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे.

संघाने उपलब्ध करून दिलेल्या गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघसंचालक डॉ. गिरीश आफळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.