Pimpri News: कोरोना ‘RT-PCR’ चाचणीचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळावा – भापकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना संक्रमणवर प्रतिबंध बसावा यासाठी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या ‘RT-PCR’ व अँटीजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. रॅपिड अँटेजन डिटेक्शन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासाच्या आत मिळतो, मात्र RT-PCR चा रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांची प्रकृती गंभीर होते. त्यामुळे चाचणीचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील भयानक परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.  भापकर यांनी म्हटले आहे की, रुपीनगर तळवडे येथील रहिवासी कमल पांडुरंग धुकटे (वय 58) यांचे रिपोर्ट येण्यास दहा दिवस लागले. रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.  मोहननगर परिसरातील नागरिक चंद्रकांत पोटघन यांनी 9 सप्टेंबरला ‘RT-PCR’ टेस्ट केली आहे. त्यांनी व त्यांच्या मुलांनी वारंवार एचडीएफसी शाहूनगर येथील टेस्टिंग सेंटरला फेऱ्या मारून देखील आजपर्यंत त्यांना रिपोर्ट मिळाले नाहीत.

पिंपरी-चिंचवडमधील रुग्ण संख्या साठ हजार पार झाली आहे. तर, कोरोना बळींची संख्या एक हजारांहून अधिक आहे. दिवसाला वीस ते पंचवीस रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी अत्यंत वेगाने वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचा गलथान व भोंगळ कारभार, आणि योग्य समन्वयाचा अभाव आहे. ‘RT-PCR’चे रिपोर्ट आठ ते दहा दिवस येत नाहीत, रिपोर्ट येईपर्यंत हे संक्रमित रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाजात फिरतात. त्यामुळे विषाणूंचा प्रसार होतो.

कोरोना अँटीजेन व ‘RT-PCR’ टेस्टिंग केलेल्या रुग्णांकडून संक्रमण होऊ नये, म्हणून प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी. अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासांत देण्यात यावा तसेच ‘RT-PCR’ रिपोर्टही दोन दिवसांत देण्याची व्यवस्था करावी, या टेस्ट करण्यामध्ये योग्य समन्वय ठेवावा. अँटीजेन टेस्ट व ‘RT-PCR’ टेस्ट करणाऱ्या रुग्णांना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचा अधिकृत दाखला देण्यात यावा, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.