Pimpri news: कोरोना फटका! वल्लभनगर आगाराचे दिवाळी उत्पन्न यंदा निम्यापेक्षा कमी

एमपीसी न्यूज  – कोरोनाचा फटका कामगारनगरीतील  वल्लभनगर आगारालाही बसला आहे. यंदा आगाराला दिवाळीचे उत्पन्न कमी मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळी उत्पन्नापेक्षा सुमारे सत्तर टक्के फटका आगाराला बसला आहे. गतवर्षी सुमारे 6 लाख रुपयाचे उत्पन्न आगाराला मिळाले होते. मात्र, यंदा प्रवाशांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळाला नसल्याने सुमारे दोन ते अडीच लाख इतकेच उत्पन्न गुरुवार (दि.19) पर्यंत आगाराला मिळाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला दिवाळी निमित्ताने मोठ्या उत्पनाची आशा असते. मात्र, यंदा कोविड 19 मुळे प्रवाशी म्हणावे तसे मिळाले नसल्याने आगाराचे नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त वल्लभनगर आगार प्रशासनाने 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 10 जादा बसेसचे नियोजन केले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील बहूसंख्य कामगार, नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी गेल्याने ते परत आले नाही. तर, शाळा कॉलेज बंद असल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थींची संख्या कमी होती. यामुळे यंदा जादा व अन्य बसेसला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्यावर्षी 6 लाखांपर्यंत दिवाळीचे आगाराला उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा गुरुवार पर्यंत दोन ते अडीच लाखांपर्यंतच उत्पन्न मिळाले आहे.

स्थानक प्रमुख पल्लवी पाटील म्हणाल्या, ”येत्या काळात आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी नियोजन केले आहे. प्रवाशांना अजून सोयी-सुविधा पुरविल्या जातील. सुरक्षित सेवा देण्यासाठी आगार प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना देवदर्शन व अन्य कामानिमित्त आगाराच्या बसेस उपलब्ध केल्या जात आहेत. तर, 40 जणांना ग्रुप बुकिंगची सुविधा सुरु केली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.