Disha Salian Case: कोरोना चाचणी अहवालामुळे दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालाला विलंब, पोलिसांचा दावा

Corona test report delays Disha Salian's autopsy report, police claim ऑफिसमध्ये दिशाच्या सहका-यांना खूप चांगले क्लायंट मिळत होते, तर तिचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती.

एमपीसी न्यूज – सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे नंतर चर्चेत आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला होता. पोलीस चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले गेले होते.

दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसातील सूत्रांचे म्हणणे आहे की, ती खूप तणावात होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. सोबतच सूत्रांनी सांगितले की, कोरोना चाचणीच्या अहवालामुळे दिशाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन व्हायला दोन दिवस उशीर झाला होता.

माहितीनुसार असे समोर आले आहे की, ऑफिसमध्ये दिशाच्या सहका-यांना खूप चांगले क्लायंट मिळत होते, तर तिचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. त्यामुळे तिचा मूड चांगला व्हावा, या उद्देशाने तिच्या मित्रांनी एक पार्टी ठेवली होती.

दिशा मुंबईच्या मालवणी भागात तिच्या घरी मित्रांसोबत पार्टी करत होती. 8 जूनच्या रात्री तिला तिच्या एका मित्राचा लंडनहून फोन आला आणि दिशा त्याच्याशी बराच वेळ बोलली. यावेळी ऑफिसच्या कामाबद्दलही त्यांची चर्चा झाली होती आणि थोड्या वेळाने दिशा 14 व्या मजल्यावरून खाली पडली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांना दिशाचा मृतदेह रेड टॉप आणि ग्रे कलरच्या स्कर्टमध्ये सापडला. कोरोनामुळे दिशाचा स्वॅब घेतला गेला आणि कोविड- 19 ची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले गेले. 11 जून रोजी कोरोनाचा अहवाल आला, त्यामुळे शवविच्छेदनासाठी दोन दिवस उशीर झाला होता.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचे प्रकरण हे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आणि या दोन्ही प्रकरणात अद्याप कोणताही संबंध आढळला नाही.

यापूर्वी काही मीडियामध्ये आलेल्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिशाचा मृतदेह विवस्त्र आढळला आणि सोबतच शवविच्छेदनासाठी जाणीवपूर्वक उशीर करण्यात आहे.

यानंतर रविवारी मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, ‘दिशा सालियनचा मृतदेह विवस्त्र आढळला नसून यासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला होता. त्यावेळी तिचे पालकही घटनास्थळी हजर होते.’

दिशा सालियानच्या मृत्यूस्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले आहे. या घटनेच्या एका आठवड्यानंतर 14 जून रोजी सुशांतसिंह राजपूतनेही आत्महत्या केली. तेव्हापासून लोक या दोन प्रकरणांमध्ये संबंध असल्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. दिशा सुशांतची माजी मॅनेजर होती. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही दुवा असावा असा संशय व्यक्त केला जात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.