Pimpri : कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून आकारलेल्या बिलांची पालिका करणार तपासणी

Corona to inspect bills charged by private hospitals to patients :कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून आकारलेल्या बिलांची पालिका करणार तपासणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका परिसरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोना आजारावर उपचार केले जात आहेत. तथापि, काही खासगी रुग्णालयांकडून कोरोनाच्या उपचाराकरिता आकारल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी केली जाणार आहे.

त्यासाठी मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर यांची नियंत्रित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयात देखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना आजाराचे उपचाराकरिता ज्या प्रकारे बिले आकारली जात आहे, त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रुग्णालयनिहाय 30 किंवा त्यापेक्षा जास्त बेडसंख्या उपलब्ध असलेली रुग्णालये किती आहेत. त्या रुग्णालयाचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक इत्यादी माहिती प्रभारी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी नियंत्रित अधिका-यांना उपलब्ध करुन द्यायची आहे.

तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती देखील त्यांनीच मुख्यलेखापरिक्षकांना उपलब्ध करुन द्यावयाची आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत का, असल्यास अशा रुग्णांपैकी पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या किती आहे.

कोरोना आजाराच्या रोग लक्षणांनुसार लक्षणे आणि लक्षणे नसलेल्या आजाराचे किती रुग्ण आहेत. रुग्णांकडून बील कशा प्रकारे आकारले जाते.

याशिवाय अशा खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची संख्या, बेडचे नियोजन, रुग्णालयीन कामकाजाकरिता उपलब्ध असलेल्या स्टाफची पदनिहाय माहिती संकलित करावी. त्यासाठी मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर यांची नियंत्रित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

त्यांना सहाय्य करण्यासाठी कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, कनिष्ठ अभियंता जयकुमार गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माहिती संकलनाकरिता रुग्णालनिहाय कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी कुंभोजकर यांच्या नियंत्रणाखाली काम करायचे आहे. दैनंदिन केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल त्यांच्याकडे लिखित स्वरुपात सादर करावयाचा आहे.

कुंभोजकर यांनी खासगी रुग्णालयांकडून उपचाराकरिता जे बील आकारले जाते त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करायचा आहे. या कार्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचा-यांनी कामकाज न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन नियम 2005 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

कर्मचा-यांच्या या कालावधीतील हजेरीचा अहवाल मुख्य लेखापाल विभागाने त्यांच्या मूळ आस्थापना असलेल्या विभागाकडे पाठवाव, असे निर्देश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.