Corona Treatment Rate : खासगी रुग्णालयांसाठी कोरोना उपचारांचे दर निश्चित

निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत

एमपीसी न्यूज – खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारांसाठी येणाऱ्या अव्वाच्या सव्वा रकमेच्या बिलांतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सादर केलेल्या अधिसूचनेच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजूरी दिली. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. त्यामुळे निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचनेची मुदत काल संपली. त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

यापुर्वीच्या अधिसुचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारच्या भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहे.

दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील. रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांकडून अशाप्रकारे दर आकारले जाऊ शकतात. सामान्य वॉर्डमधील नियमित विलगीकरण ( प्रती दिवस) अ वर्ग शहरांसाठी चार हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी तीन हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2,400 रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. कोरोना चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.

# व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण

अ वर्ग शहरांसाठी 9,000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 6,700 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 5,400 रुपये

# केवळ आयसीयू व विलगीकरण

अ वर्ग शहरांसाठी 7,500 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 5,500 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 4,500 रुपये

अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी),

ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली. सर्व जिल्हा मुख्यालये ब वर्गात तर अ आणि ब वर्गात नसलेली शहरे क वर्गात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.