Corona Update: केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा घेतला आढावा, दिल्या सूचना

Corona Update: Union Health Minister Harsh Vardhan reviews Maharashtra, gives instructions 602 सरकारी आणि 235 खाजगी अशा एकूण 837 प्रयोगशाळा मार्फत आपली चाचण्यांची क्षमता वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्यातील सर्व 36 जिल्हे बाधित आहेत. डॉ हर्षवर्धन यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड-19 स्थितीचा आणि त्याबाबतच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. राज्यातले सर्व जिल्हे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधे जोडण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

एनसीडीसीचे संचालक डॉ एस. के. सिंग यांनी महाराष्ट्रातल्या कोविड-19 स्थितीचे सादरीकरण केले. यात सक्रिय रुग्ण जास्त संख्येने असलेले, मृत्यू दर, रुग्ण दुपटीचा काळ, चाचण्या कमी संख्येने असलेले जिल्हे ठळकपणे दर्शवण्यात आले.

आरोग्य पायाभूत संरचना उपलब्धता आणि रुग्णसंख्या जास्त असलेले मृत्यू दर या पार्श्वभूमीवर जास्त लक्ष पुरवण्याची आवश्यकता असणारे जिल्हे याबाबतही सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाबतच्या सध्याच्या स्थितीविषयी बोलताना डॉ हर्षवर्धन यांनी, प्रतिबंधित क्षेत्रांच्या वाढत्या संख्येकडे तातडीने लक्ष पुरवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रभावी प्रतिबंध धोरणासाठी दाट लोकवस्तीच्या भागात, प्रादुर्भाव लगेच होऊ शकण्यासंदर्भात मॅपिंग करण्यात यावे. मृत्यू दरात वाढ होत असल्याकडे लक्ष पुरवतानाच प्रती दशलक्ष लोकसंख्येत करण्यात येणाऱ्या चाचण्यांकडेही लक्ष द्यायला हवे असे हर्षवर्धन म्हणाले.


आरोग्य पायाभूत सुविधाबाबत बोलताना डॉ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील आयसीयू, व्हेंटीलेटर आणि निदान प्रयोगशाळा यंत्रणा बळकट करण्याच्या सूचना देतानाच येत्या काळातल्या रुग्णांसाठीही आयसीयू उपलब्धता सुनिश्चित करावी असे सांगितले. मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत बोलताना, आरोग्य कर्मचाऱ्याना, ऑनलाईन प्रशिक्षण मोड्यूल द्वारे दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावावा असे ते म्हणाले.

कोविड-19 चे तत्पर निदान आणि व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रयोगशाळानी कोविड-19 चाचण्यांचे निदान अहवाल तत्परतेने द्यावेत याची खातरजमा करावी असे त्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

602 सरकारी आणि 235 खाजगी अशा एकूण 837 प्रयोगशाळा मार्फत आपली चाचण्यांची क्षमता वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 5,21,340 नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून गेल्या 24 तासात 1,51,808 चाचण्या झाल्याची माहिती त्यांनी दिली.

आतापर्यंत 136 लाख एन 95 मास्क आणि 106 लाखाहून अधिक पीपीई राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थाना पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बिगर कोविड रूग्णालयात पीपीईचा, मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून सुयोग्य वापर सुनिश्चित करायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, मनुष्यबळ दृढ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. व्हेंटिलेटरसह आयसीयू खाटा, ऑक्सिजन सुविधेसह खाटा मधे वाढ, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.

याशिवाय जिल्ह्यांनी प्रतिबंधात्मक आराखड्याची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. त्याबरोबरच महत्वाच्या बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींसाठी कडक विलगीकरण याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे.

आवश्यक आरएमएनसीएचए + एन सेवा विशेषकरून गरोदर महिलांसाठीच्या सेवा, रक्त नमुने संकलन, केमोथेरपी, डायलिसीस यासारख्या सेवांकडे लक्ष पुरवण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्या.

टीबी निदान आणि व्यवस्थापन यासाठीच्या आवश्यक सेवा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कारण या रुग्णांना कोविड-19 चा धोका जास्त राहतो. कोविड-19 साठीच्या सर्वेक्षणा बरोबरच टीबी रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण व्हायला हवे असे हर्षवर्धन म्हणाले. प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई हवी असेही ते म्हणाले.

या सेवा देण्यासाठी राज्याच्या अधिकार्यांनी राज्यात कार्यरत असलेल्या आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेन्टरच्या 3,775 केंद्राच्या जाळ्याची मदत घेण्याचे सुचविण्यात आले.

बाह्यरुग्ण सेवेसाठी टेलीमेडिसिन आणि घरोघरी सेवा पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्याचे सुचवण्यात आले. आरोग्य कर्मचार्यांचे वेतन वेळेवर मिळेल याची सुनिश्चिती करण्याबरोबरच आवश्यक औषध साठ्याबरोबरच तात्पुरते मनुष्य बळ नेमण्याचे आवाहनही करण्यात आले.

कोविड-19 साठी लस आणि औषधासाठी अनेक चाचण्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी आपण उत्तम प्रथांचा अंगीकार करायला हवा. सर्व जिल्हेआणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वयाने काम करायला हवे असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.