Corona Update: यूपीतील बस्ती येथे पुण्याहून परतलेल्या ४४ स्थलांतरित मजुरांना कोरोनाची लागण

corona update Uttar Pradesh 44 Basti migrants back from Pune found corona positive

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारने एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजुरांना बसला. देशाच्या विविध भागात कामासाठी गेलेले लाखो मजूर अडकून पडले. कालांतराने सरकारने त्यांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिली. परंतु, काही राज्यात हे स्थलांतरित मजूर आपल्या मूळ गावी गेल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती येथे पुण्याहून आलेल्या ३२३ मजुरांपैकी ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या सर्व बाधित मजुरांवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित मजुरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  हे सर्व मजूर 16 मे रोजी पुण्याहून परतले होते. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, कोरोनाग्रस्त भागातून आलेल्या स्थलांतरित मजुरांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.

मोठ्या संख्येने हे मजूर राज्यात येत आहे. यातील अनेक जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. बाधितांपैकी अनेकांमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत. अशा लोकांना 21 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आमच्या अंगणवाडी सेविका त्यांच्यावर लक्ष ठेवून असून त्या त्यांच्या घरी जाऊन भेट देत असतात. वारंवार त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्यांना त्यांच्या राज्यात प्रवेश नाकारला आहे. कर्नाटकने महाराष्ट्रातील पास असणाऱ्यांना आपल्या सीमारेषेत प्रवेश दिलेला नाही. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रात असणाऱ्या कर्नाटकातील नागरिकांना तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.