Pimpri News : जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिका-यांनी घेतली पहिली लस

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या लसीकरणाला आज (शनिवारी) सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरण होणार आहे. आज दिवसभरात 8 केंद्रावर वैद्यकीय क्षेत्रातील 800 जणांना लस दिली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना लस टोचवून लसीकरणाची सुरुवात झाली.

जिजामाता रुग्णालयात महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरुवात झाली. उपमहापौर केशव घोळवे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीत तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर यावेळी उपस्थित होते.

लस टोचक अधिकारी लसीबाबत लस घेणा-याला माहिती देतात. लस टोचविल्यानंतर त्यांना अर्धा तासासाठी निरीक्षक कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणताही त्रास होत नसल्यास घरी सोडले जाते. तसेच दुस-या डोसबाबत माहिती दिली जाते. एक महिन्याने तो डोस दिला जातो.

आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचण्यात येणार आहे.  महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा  17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे.

लसीकरणाची माहिती देताना महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात एका केंद्रावर 100 जणांना लस टोचण्यात येणार आहे. अशा 8 केंद्रावर 800 जणांना दिवसभरात लस देण्यात येणार आहे. तर, एक महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. महापालिकेने ज्यांना लसीकरणाला बोलवले आहे. त्यांनी लस टोवून घ्यावी. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचवून झाल्यावर आरोग्य क्षेत्रातील फिल्डवर काम करणा-या लोकांना, 50 वर्षापुढील नागरिक, विविध गंभीर आजार असलेल्यांना नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वांना लस दिली जाईल”.

‘या’ आठ केंद्रावर लसीकरणाला सुरुवात!
लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या 8 केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.