Corona Vaccination : कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना ; असा आहे प्राधान्यक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरणा पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 तारखेपर्यंत स्वाभिमान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. राजेश टोपे यांनीही आज रक्तदान केलं. त्यानंतर ते बोलत होते.

टोपे म्हणाले, राज्यातील 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस (Corona Vaccination) पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथं बसवले जाईल.

केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.

राज्यात एकावेळी तीन कोटी लोकांना लसीकरण होईल एवढी साठवणूक क्षमता आहे. तसेच, लसीकरणासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन (COVIN) तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून संबंधित नागरिकांना नोटिफिकेशन देऊन लसीकरणाच्या बुथवर बोलावले जाईल.

ग्रामीण भागात ग्रामीण आरोग्य केंद्र तर शहरी भागात अर्बन हेल्थ सेंटरवर हे लसीकरण करण्याचा विचार सुरू आहे. केंद्राकडून येणारी लस वाशीतील सेंटरवर सर्वप्रथम येईल तिथून विभाग आणि विभागातून संबंधित जिल्हे आणि तालुक्यात ती पाठवली जाईल असे टोपे म्हणाले.

लस देण्यासाठी जवळपास 16 हजार समन्वयकांची (Vaccinators) नेमणूक करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर अशा तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बायोटेक फार्मा आणि सिरम इन्स्टिट्यूट या दोघांच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन तयार केला असल्याचे टोपे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.