Maval News : कोरोना लसीकरण मदत कक्ष ठरतोय जेष्ठ नागरिकांना आधार

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मावळ तालुक्यात सुरू असून ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत तर खासगी दवाखान्यांमध्ये 250 रुपयांना ही लस दिली जात आहे. रुग्णालयामध्ये होणारी गर्दी व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार सुनिल शेळके यांनी लसीकरण केंद्रांवर ‘कोरोना लसीकरण मदत कक्ष’ सुरू केले असून त्याचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळत आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, खडकाळा, आढले, येळसे, टाकवे, कार्ला या आरोग्य केंद्रावर तसेच खंडाळा उपकेंद्र व कान्हे व काले कॉलनी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस दिली जात आहे. त्याचबरोबर सोमाटने फाटा येथील पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथील अथर्व हॉस्पिटल व लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये लस दिली जात आहे.

खासगी रुग्णालयात लस देताना आधार व ओळखपत्रावरून संबंधित व्यक्तीची पोर्टलवर नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नोंद नसलेल्या व्यक्ती थेट लस घेण्यास खासगी रुग्णालयात जाऊ शकतात.

को-विन पोर्टलवर ‘ऑनलाइन’ नोंदणी करणे काही जेष्ठांना शक्य होत नाही. तांत्रिक गोष्टींची अडचण येत असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करता येत नाही. तसेच नोंदणी झाली आहे की नाही याबद्दलही बऱ्याच जणांना समजत नसल्यामुळे या मदत कक्षाचा ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच उपयोग होत आहे.

आमदार शेळके यांनी सुरू केलेल्या मदत कक्षामध्ये लस देण्यासाठीची नोंदणी करणे, नोंदणी झाल्यानंतर आपल्याला दिलेल्या वेळेनुसार नागरिकांना येण्याचे सांगणे, लस घेतल्यानंतर समुपदेशन या ठिकाणी केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना पडलेल्या प्रश्नांचे याठिकाणी निरसन केले जात आहे. लस घेण्याआधी पासून ते लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी त्याचे फायदे व मानसिक आधार देण्याचे काम या मदत कक्षाच्या माध्यमातून केेेेले जात आहे.

डॉ. वामन गेंगजे ( वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे ) :- शेळके यांनी मदत कक्ष सुरू केल्यामुळे दवाखान्यातील यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जेष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहणे व एका ठिकाणी बसून राहणे आदी गोष्टी शक्य नसतात. मदत कक्षामुळे त्यांना वेळ दिली जात असून लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुलभता आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.