Corona Vaccination News : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

एमपीसीन्यूज : उद्या शनिवार, दि. 1 मे पासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या सुचनेनुसार 18 ते 44  वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी को- विन पोर्टलवर पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे.

या लसीकरणासाठी पुणे महापालिकेतर्फ कमला नेहरू रुग्णालय- मंगळवार पेठ व राजीव गांधी रुग्णालय- येरवडा या दोन रुग्णालयातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

पुणे महापालिका हद्दीतील लसीकरण केंद्रांवर  लसीकरणाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 4  पर्यंत असणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी को- विन पोर्टलवर नोंदणी केली असेल त्यांनाच या दोन रुग्णालयाची निवड केली असेल त्या लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे. 1 मे रोजी 350  इतक्याच लाभार्थ्यांनाच को- विन पोर्टलवर नोंदणी करून रुग्णालय निवडता येणार आहे .

ही नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉटनुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर जावयाचे आहे. या दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंदणी न करता थेट जावू नये. त्यांना लस मिळणार नाही, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

शनिवार (दि. 1 ) व रविवार (दि. 2) रोजी 45  वर्षापुढील लाभार्थ्यासाठी असलेली पुणे महानगरपालिकेची इतर सर्व लसीकरण केंद्रे लससाठा उपलब्ध नसल्याने बंद राहणार आहेत. सोमवार (दि 3 मे ) पूर्वी शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास 45 वर्षापुढील नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेकडील लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येतील.

त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये तीन केंद्रांवर होणार लसीकरण

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना या तीन लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. पूर्व नोंदणी केलेल्या 200 नागरिकांना या केंद्रावर सकाळी 11  ते सायंकाळी 5 या वेळात लसीकरण करता येईल.

दरम्यान , 1 मे रोजी लस साठा शिल्लक नसल्याने 45  वर्षांपुढील नागरिकांचे  लसीकरण होणार नसल्याचेही महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.