Pimpri News : मिशन 25 हजार! सुपर स्प्रेडर्ससह 45 वर्षांपुढील नागरिकांचे आज रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना लसीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मिशन 25 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.  सुपर स्प्रेडर्स सह वय वर्षे 45  व त्यावरील नागरिकांनी आज (सोमवारी)  सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

पुणे जिल्हयात 1 लाख कोविड लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे. त्यातील 25 हजार लसीकरणाच्या उद्दीष्टपुर्तीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले, जगभरात कोविड लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. आरोग्याच्या सुरक्षितेसाठी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण महत्वाचे ठरले आहे. भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये आपण सहभागी आहोत.

प्रतिदिन 25 हजार नागरिकांचे लसीकरण करता येऊ शकेल एवढी लसीकरण केंद्रे महानगरपालिकेने सुरु केलेली आहेत.  अत्यावश्यक सेवेतील अधिक व्यक्तींशी विविध कामानिमित्त संपर्कात येणा-या सुपर स्प्रेडर्संना प्राधान्याने लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड 19 लस देण्याचे प्रयोजन आहे.

यामध्ये दुकानदार, भाजी विक्रेते, वाहनचालक, एस. टी. आणि  पी.एम.पी.एम.एल. मध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिक्षक, आरोग्य सेवा देणा-या व्यक्ती आदींचा समावेश आहे. या सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी देखील महानगरपालिकेने व्यवस्था केली आहे. लसीकरण केंद्र दूर असल्यास नागरिकांना त्या केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  लोकप्रतिनिधी, विविध सेवाभावी संघटना, सामाजिक व राजकिय कार्यकर्त्यांनी या मोहिमेध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील आणि परिसरात असणा-या 45 वर्ष वयावरील तसेच लसीकरणासाठी पात्र असणा-या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन त्यांचे लसीकरण करुन घ्यावे. तसेच त्यांना आवश्यक सहकार्य देखील करावे असे आयुक्त पाटील म्हणाले.

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर परिणाम होणे साहजिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वत: च्या आरोग्याची काळजी घ्यावी. होम आयसोलेशन मध्ये असणारे काही कोरोना बाधित रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत असून असे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.

होम आयसोलेशन मध्ये असणा-या कोरोना बाधिताने नियमांचे पालन न केल्यास अशा व्यक्तींची माहिती तात्काळ महापालिकेला देण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणा-या अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने योग्य पध्दतीने मास्कचा वापर, फिजीकल डिस्टसिंग चे पालन, आणि सॅनिटायझेशन या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रत्येकाने सहभाग आणि सहकार्य करुन मोहिम यशस्वी करावी असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.