Corona Vaccination : कोणाला कधी मिळणार लस, पंतप्रधान मोदींनी जाहीर केला लसीकरणाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतात दोन कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोना लसीकरणासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 16 जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन ‘मेड इन इंडिया’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोकांना लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील आणि 50 वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल. येत्या काही महिन्यांमध्ये 30 कोटी लोकांना लस देण्याचं ध्येय असल्याचे मोदी म्हणाले. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

कोरोना लसीकरणासाठी कोविन नावाचं मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला या अ‍ॅपच्या माध्यमातून लगेच प्रमाणपत्र दिलं जाईल. तसंच दुसरा डोस कधी द्यायचा, याचं रिमांइमडरही हे अ‍ॅप देईल. देशातल्या नऊ राज्यांत बर्ड फ्लू पसरल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी पशुसंवर्धन मंत्रालयानं नियमावली जाहीर केली आहे. तिचं पालन करणं गरजेचं आहे. जिथं बर्ड फ्लू नाही, तिथल्या सरकारांनी सतर्क राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.