Corona Vaccine Update : स्वदेशी कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी !

एमपीसी न्यूज :  भारत बायोटेक कंपनी स्वदेशी कोरोन लस ‘कोवॅक्सिन’ची निर्मिती करत आहे. ‘कोवॅक्सिन’च्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नसल्याचं समोर आलं आहे.

पोर्टल ‘मेडआरएक्सआयव्ही’ वर उपलब्ध करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, ज्या स्वयंसेवकांना लसी देण्यात आली होती, त्यांच्या शरीरात लसीने अँन्टीबॉडी तयार करण्याचं काम केलं आहे. निष्कर्षांनुसार, चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाच्या शरीरावर लसीचा डोस दिल्यानंतर काही गंभीर परिणाम झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, त्याचा लसीकरणाशी कोणताही संबंध असल्याचं दिसून आलं नाही. कोवॅक्सिन लसीची सुरक्षा आणि तिच्या प्रभावाच्या आकलनासाठी पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्यात आली होती.

कोवॅक्सिनच्या चाचणीच्या निष्कर्षांच्या कागदपत्रांमध्ये सांगण्यात आलं आहे की, बीबीवी 152 ला दोन डिग्री सेल्सियस ते आठ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ठेवण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत याच तापमानात वेगवेगळ्या लसींची साठवणूक करण्यात येते.

भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकच्या वतीने सात डिसेंबर रोजी डीसीजीआयकडे परवानगी मागण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तसेच भारत बायोटेक व्यतिरिक्त पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनेही ऑक्सफर्डची कोरोना लस कोविशिल्डच्या वापरासाठी 6 डिसेंबरला परवानगी मागितली होती. याआधी अमेरिकन औषध कंपनी फायझरने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी चार डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.