Corona Vaccine : गुड न्यूज ! ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित

Good news! Safe corona vaccine developed by Oxford University : या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित असल्याचं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाविरोधात लढायला सज्ज करत असल्याचं स्पष्ट होतं आहे.

याबाबत ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीची चाचणी 1,077 माणसांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होत असल्याचं तसंच कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे.

या चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक आहेत. मात्र, कोरोना विषाणूचं शरीरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी ही लस सर्वसमावेशकदृष्ट्या परिपक्व आहे का? हे आताच सांगणं कठीण आहे. तसेच, लस तयार व्हायला साधारण वर्षभराचा अवधी लागू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणं आहे.

ही लस कशी काम करते ?

शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसऱ्या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत.

यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि शरीरात कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते.

या प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि रुग्णाच्या शरीरात अँडीबॉडीजची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान टी सेलही कार्यरत होतात.

थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना विषाणूच्या ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.