Corona virus Vaccine : रशियन बनावटीच्या ‘स्पुटनीक फाईव्ह’ लसीची मानवी चाचणी पुण्यात संपन्न !

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणुवर मत करण्यासाठी जगातील वैद्यकीय शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि संशोधक अहोरात्र झटत आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या चाचणीनंतर आता रशियन बनावटीची ‘स्पुटनीक फाईव्ह’ (SPUTNIK V) लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात संपन्न झाली.

हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल आणि नगर रस्त्यावरील वढू येथील केईम हॉस्पिटल मध्ये मानवी चाचणी संपन्न झाली. 18 ते 60 वयोगटातील कोरोना न झालेल्या 17 सुदृढ व्यक्तींना ही रशियन लस दिली गेली.

या संदर्भात सविस्तर माहिती देताना नोबेल हॉस्पिटलचे संचालक व संशोधन विभागप्रमुख डॉ. एस. के. राऊत म्हणाले, रशिया देशात तयार झालेली ‘स्पुटनिक फाईव्ह’ ही पहिल्या टप्प्यात यशस्वी मानवी चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात 3 ते 5 डिसेंबर दरम्यान संपन्न झाली. याकरीता ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही अशा आरोग्यदायी व सुदृढ 17 स्वयंसेवक व्यक्तींना ही लस दिली गेली आहे. यामध्ये 2 महिला तर अन्य 15 पुरूष होते.

या लसीचे दोन डोस असणार आहेत. 21 दिवसांनंतर याच स्वयंसेवकांना पुन्हा दुसरा डोस दिला जाईल. सर्व लस दिलेल्या व्यक्तींना लस दिल्यामुळे कोणकोणते शारिरीक त्रास अथवा बदल, लक्षणे दिसतात त्यावर 180 दिवस लक्ष ठेवले जाईल.

सर्व स्वयंसेवकांकडून संमतीपत्र घेऊनच ही लस दिली गेली आहे. प्रत्येक स्वयंसेवकाच्या मोबाईलमध्ये एक ई डायरी ॲप डाऊनलोड केले असून त्यामध्ये त्यांनी लक्षणे, त्रास किंवा बदल याची अचूक माहिती टाईप करून भरायची आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माध्यमातून भारत सरकारच्या पूर्वपरवानगीने ही मानवी चाचणी केली जात आहे.

रशियाकडून दुसऱ्या टप्प्यात भारतात फक्त 100 जणांवर या लसीची चाचणी केली जात आहे. त्यामध्ये पुण्यातून दोन हॉस्पिटलमध्ये या लसीचे तीन दिवसीय वेळापत्रक संपन्न झाले आहे. आगामी 21 दिवसांनी दुसरा डोस दिल्यानंतर नेमका काय फरक पडतो हे लक्षात येईल, असा विश्वास डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.