Corona Warrior Police Cops Interview : गुन्हेगारांचा पाठलाग करता करता कोरोनानेच आमचा पाठलाग केला- पोलीस नाईक लक्ष्मण आढारी

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखेत काम करत असताना पोलिसांना अनेकदा गुन्ह्यांच्या तपासासाठी, गुन्हेगारांचा पाठलाग करत संपूर्ण राज्यात तर कधी कधी देशभरात प्रवास करावा लागतो. त्यात गुन्हेगारांचा पाठलाग करणं म्हणजे मोठे जोखमीचे काम असते. कोरोना साथीच्या काळात ही जोखीम आणखी वाढली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने जुलै 2020 मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अवैध पिस्तुलांचा व्यापार करणा-या टोळीचा पर्दाफाश केला.

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पण हा तपास इथेच थांबणार नव्हता. यात अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता. दरम्यान गुन्हे शाखेतील बहुतांश कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आणि हा तपास बारगळला. पण सर्व पोलीस कोरोनामुक्त झाल्यानंतर हा तपास पुन्हा सुरु झाला.

यात सातारा जिल्हा आणि परिसरातील कुख्यात वाळू तस्कराचा देखील समावेश असल्याचे समोर आले. या तपासादरम्यान प्रवास करताना पुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोरोना झाला. त्यात पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. गुन्हेगारांचा पाठलाग करता करता कोरोनाने आढारी यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा पाठलाग केला. संपूर्ण आढारी कुटुंब नुकतेच कोरोनामुक्त झाले आहे. आढारी यांनी पुन्हा ड्युटी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर एमपीसी न्यूजने घेतलेली त्यांची मुलाखत –

प्रश्न : कोरोना साथ आल्यापासून स्वतःची कशी काळजी घेत होते ?
उत्तर : कोरोना साथीच्या काळात काळजी घेण्याबाबत वारंवार वरिष्ठांकडून सांगण्यात येत होते. अजूनही वरिष्ठ वारंवार सर्व पोलिसांना काळजी घेण्याच्या सूचना करतात. आम्ही व्यवस्थित अंतर ठेवून बोलायचो, मास्क लावायचो, कुठल्याही वस्तूला हात लावला तर सॅनिटायझर लाऊन हात निर्जंतूक करायचो. घरी गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात न लावता बाथरूम मध्ये जाऊन कपडे डेटॉल मध्ये भिजत घालायचो. नंतर अंघोळ करून बाहेर यायचो. मग नंतर फॅमिलीला मुलाबाळांना वेळ द्यायचो.

प्रश्न : कोरोनाची लागण झाल्याचं कधी आणि कसं समजलं ?
उत्तर : बेकायदेशीर पिस्टलची विक्री करणा-या एका टोळीचा गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस माग काढत होते. त्या गुन्ह्याची पहिली टीप मला मिळाली होती. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला तपासात सहभागी व्हायचं होतं. हा तपास सुरु असताना सातारा जिल्ह्यातील कराड येथे या प्रकरणातील एका कुख्यात आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आणि अन्य तपासासाठी तीन वेळा जावे लागले. तिसऱ्या वेळी कराड येथील उंब्रज मध्ये तपास सुरु असताना मला अचानक थंडी वाजून आली व नंतर ताप आला.

उंब्रज येथून परत यायला रात्रीचे दोन वाजले. दरम्यान पॅरासिटेमॉल गोळी घेतली. पण त्याचा काही फरक जाणवला नाही. रात्री उशिरा घरी गेल्यावर मी घरच्यांना कोणालाही जवळ येऊ दिले नाही. दुसऱ्या दिवशी माझी साप्ताहिक सुट्टी होती. बरं वाटत नसल्याने मी घरीच आराम केला. त्यावेळी कोरोनाबाबत काहीही मनात आले नाही. पण दुपारून अचानक खोकला लागला. खोकल्याचा खूप त्रास झाला. म्हणून खिंवसरा हॉस्पिटल येथे जाऊन कोरोनाची चाचणी केली. या चाचणीमध्ये माझा अहवाल पॉझिटिव्ह आला.

प्रश्न : तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरच्यांना काय सांगितले ?
उत्तर : तपासावरून आल्यानंतर मी मध्यरात्री पासून दुपारपर्यंत घरी होतो. कुणाच्याही संपर्कात आले नसलो तरी एकाच घरात असल्याने कुटुंबाची काळजी वाटत होती. माझा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच मी प्रथम घरातील सर्वांच्या कोरोना चाचण्या करून घेतल्या. माझा चार वर्षाचा मुलगा, सात वर्षांची मुलगी आणि पत्नी यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

माझा आणि पत्नीचा एक्सरे काढला. त्यामध्ये माझ्या छातीत कफ दिसत होता आणि मला न्युमोनिया (फर्स्ट स्टेज) देखील झाला होता. पण सुदैवाने पत्नी आणि दोन्ही मुलांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना गोळ्या, औषधे देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले. मला मात्र रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले.

प्रश्न : पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर सहकाऱ्यांनी कसा धीर दिला ?
उत्तर : सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख सर, कोरोना सेलचे अधिकारी, कर्मचारी आणि सहका-यांनी वेळोवेळी फोन करून तब्बेतीची विचारपूस केली. पत्नी आणि मुलांना होम क्वारंटाईन  करण्यात आले होते. त्यांना काहीही मदत लागली तरी तत्काळ सांग, आम्ही सगळी व्यवस्था करतो. असे सगळ्यांनी सांगितले होते. घरच्यांची कुठलीही काळजी करू नको, त्यांच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देतो, तू तुझी काळजी घे आणि लवकर बारा हो, असा धीर सर्वजण वेळोवेळी देत होते.

प्रश्न : तुम्ही सहकाऱ्यांना काय काळजी घ्यायला सांगितले ?
उत्तर : माझा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सहकारी आणि मित्रांना तसेच मागील तीन ते चार दिवसात जे जे माझ्या संपर्कात आले होते, त्या सगळ्यांना मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. संपर्कातील प्रत्येकाला कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितले. तसेच त्यांनी त्यांचा चाचणी अहवाल येईपर्यंत इतरांच्या संपर्कात येऊ नये, असेही सांगितले. मास्क वापरा. शक्यतो घरी जाणे टाळा, एकत्र जेवण करू नका, दररोज वाफ घ्या, काढा, गरम पाणी पिण्यास सांगितले.

प्रश्न : पोलीस प्रशासनाने काय आणि कसे सहकार्य केले ?
उत्तर : जसे की मी सांगितले आहे, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार सर, कोरोना सेलचे अधिकारी, कर्मचारी आणि सहका-यांनी वेळोवेळी फोन करून तब्बेतीची विचारपूस केली. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ निःसंकोचपणे सांग. उपचार व्यवस्थित सुरु आहेत का, डॉक्टर वेळेवर लक्ष देतात का, याबाबत सर्वजण विचारत होते. या काळात प्रत्येकाने धीर दिला आहे.

प्रश्न : आता दिनचर्या बदलली आहे का ?
उत्तर : हो, नक्कीच. सकाळी आणि संध्याकाळी वाफ घेणे, दोन ते तीन वेळेला गरम पाणी पिणे, सी. व्हिटामिनच्या गोळ्या खाणे, मल्टीव्हिटामिनच्या गोळ्या खाणे, सकाळी योगा करणे, चालणे आणि अन्य व्यायाम सुरु आहे. त्याचबरोबर आहाराचे देखील काटेकोर नियोजन केले आहे.

प्रश्न : आता स्वतःची, कुटुंबाची आणि सहकाऱ्यांची कशी काळजी घेता ?
उत्तर : बाहेरच्या कुठल्याही वस्तूला हात लावला तर ते नाकातोंडाला न लावता स्वच्छ साबणाने किंवा हँडवॉशने धुतो. सॅनिटायझरचा वापर वारंवार केला जात आहे. दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना मास्क न काढता, अंतर ठेवून बोलत आहे. आरोपींना पकडल्यावर आपली आणि आरोपीची देखील काळजी घेतली जात आहे.

प्रश्न : नंतर टेस्ट केलीत का ?
उत्तर : हो, खबरदारी म्हणून पुन्हा टेस्ट केली होती. पण नंतर केलेली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आता मला कुठलाही त्रास नाही.

प्रश्न : सहकारी, मित्र आणि नागरिकांना काय सल्ला द्याल ?
उत्तर : घरी रहा सुरक्षित रहा. काळजी घ्या. खूपच महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा.  तुमच्या सेवेसाठी पोलीस, डॉक्टर, इतर सरकारी कर्मचारी दिवसरात्र कष्ट घेत आहेत. आपण सगळ्यांनी मिळून कोरोनाला हरवायचं आहे.  जयहिंद!!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.