Blog by Rajan Wadke : निमित्त कोरोनाचे, आव्हान सामाजिक स्वच्छतेचे

Corona's excuse, the challenge of social hygiene : ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा ब्लॉग

एमपीसी न्यूज : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्वच्छतेची गरज अधोरेेखित झाली आहे. वाचा ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा ब्लॉग….

——————————————————

स्पॅनिश फ्लू नंतर शंभर वर्षांनंतर आलेल्या कोरोना या विषाणूजन्य साथीच्या आजाराने जगभरात उच्छाद मांडला आहे. लाखो लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. आपल्या देशातही कोरोनाचे लोण पसरले आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुणे-मुंबईमध्ये खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वर-खाली होत आहे. या आजारावरील उपचारावर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, त्याला ठोस यश आलेले नाही.

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लोकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात धुवावेत, स्वच्छता बाळगण्याचे आवाहन पंतप्रधानांपासून स्थानिक नगरसेवकापर्यंत, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पोलिस अधिकारी जनतेला करत आहेत.

त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी हे आवाहन करत आहेत. त्याला प्रतिसादही मिळतो आहे.

तरीही कोरोना रुग्णांची संख्या अपेक्षेनुसार कमी होत नाही. एकूणच सध्या सर्व समाज एका भीतीच्या सावटाखाली आहे.

कधीतरी कालांतराने करोनावर आपण विजय मिळवूही परंतू, या विषाणूजन्य आजारामुळे समोर आलेल्या निरक्षरता, गरीबी आणि अपुऱ्या निवाऱ्याच्या गंभीर वास्तवावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार का, हे प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह भारतापुढील उभे ठाकले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक कर्करोग तज्ज्ञ ङॉ. धनंजय केळकर यांनी ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या पालक महासंघाने आयोजित केलेल्या, `करूयात सामना कोरोनाशी` या विषयावरील चर्चासत्रात बोलताना ही वस्तुस्थिती निदर्शनास आणली आहे.

सामाजिक जाण असणाऱ्या आणि अत्यंत स्पष्टपणे बोलणाऱ्या ङॉ. केळकर यांनी मांडलेला मुद्दा खरोखरच अस्वस्थ करणारा आहे.

गेल्या चार महिन्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या रुग्णालयाने रुग्णांची माहिती घेताना हे गंभीर मुद्दे पुढे आले आहेत. सुमारे 40 टक्के रुग्ण अशिक्षत असल्याचे तसेच एकाच खोलीत, घरात दहा ते पंधरा जण राहात असल्याची माहिती या रुग्णांकडून सांगण्यात आली.

त्याचबरोबर या सर्वांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचाच वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत जीवन जगताना त्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचे भान कुठून असणार.

तसेच, अशा घऱातील व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्यास तिला होम क्वारंटाइन कसे करता येणार, असे विचार करायला लावणारे मुद्दे पुढे आले आहेत.

केवळ या एका रुग्णालयात दाखल झालेल्या 40  टक्के रुग्णांची ही परिस्थिती असेल, तर शहर, राज्य आणि देशातील अशा रुग्णांची संख्या काही कोटींच्या घरात असेल. त्यांची काय परिस्थिती असेल?, ही माहिती घेतल्यास भीतीदायक वास्तव पुढे येईल.

कोरोनामुळे आपल्या देशातील सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्र आता पुन्हा आधोरेखित झाले आहे. केंद्रात, राज्यांत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असो, संधीसाधू राजकारणामुळे निरक्षरता, गरीबी, योग्य निवारा आदी समस्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांनंतरही सुटलेल्या नाहीत.

मतांसाठी राजकीय नेत्यांच्या सवलतींच्या राजकारणामुळे गांजलेल्या समाजाला आता आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन करावे लागणे, हे गेल्या 70  वर्षांतील सत्ताधाऱ्यांचे अपयश म्हणावे का ?

सत्ताधाऱ्यांच्या यशापयशावर टीका टिपण्णी होईल. पण कोरोनाच्या निमित्ताने पुढे आलेले हे चित्र बदलण्याचे आव्हान आपण स्वीकारणार की नाही ?, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून त्यानुसार प्रयत्न करण्याची गरज आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळागाळातील लोकांची शैक्षणिक व सन्मान्य आर्थिक प्रगती होणे आवश्यक आहे. गरजू लोकांना सवलती उपलब्ध करून देताना सामाजिक भान राखत त्यांच्यात स्वावलंबनाची मानसिकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या अशा 40 टक्क्यांपेक्षा अधिक परिस्थितीने गांजलेल्या जनतेला आत्मनिर्भर बनविण्याचे आव्हान स्वीकारून त्यावर मार्ग काढल्यास कोरोना किंवा अन्य कोणतीही आपत्ती आली तरी ती आपण पेलू शकू.

अन्यथा भारतीय जनता शंभर वर्षांनंतर येणाऱ्या नव्या विषाणूजन्य आजाराची पुन्हा शिकार बनेल, त्यामुळे जनतेला कोरोनामुक्त करत असताना एकूणच सामाजिक स्वच्छतेच्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत.

– राजन वडके, वरिष्ठ पत्रकार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.