India Corona Update : कोरोनाचा कहर सुरुच ! सलग तिसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, तीन दिवसात देशात साडे सहा लाख कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 341 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 34 हजार 692 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 23 हजार 354 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी एक लाखाहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 16 लाख 79 हजार 740 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 1 हजार 341 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 75 हजार 649 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.20 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 87.22 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 26 कोटी 49 लाख 72 हजार 022 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 95 हजार 397 चाचण्या शुक्रवारी (दि.16) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.