Pimpri News : कोरोनाचा परिणाम! वर्षभरात महापालिका तिजोरीत केवळ 2846 कोटींचे उत्पन्न

मागील वर्षीपेक्षा 307 कोटींनी घटले उत्पन्न

एमपीसी न्यूज – लॉकडाउन, नागरिकांची बिघडलेली आर्थिक परिस्थिती याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. 2020-21  या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, बांधकाम परवाना, एलबीटी, जीएसटी, पाणीपट्टी, आकाशचिन्ह परवाना अशा विभागातून केवळ 2846 कोटींचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे.

2019-20 आर्थिक वर्षात 3153 कोटी 8 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यातुलनेत यावर्षी 307 कोटी 8 लाखांनी उत्पन्न घटले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापालिकेला 2019-20 या आर्थिक वर्षात जीएसटी, एलबीटीतून 1709 कोटी 76 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यामध्ये 13 कोटी 72 लाखांनी घट झाली असून 1696 कोटी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

मागीलवर्षी 401 कोटी 94 लाख उत्पन्न मिळाले होते. यंदा 447 कोटी 70 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. लेखा विभागातील विविध ठेवींवरील व्याजातून 140 कोटी 48 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षात 291 कोटी 81 लाखाचे उत्पन्न मिळाले होते.

बांधकाम परवानगी विभागातून  2019-20 या आर्थिक वर्षात 586 कोटी 53 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये घट झाली असून 380 कोटी 47 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. भांडवली जमेतून 49 कोटी 5 लाख, पाणीपट्टीतून 44 कोटी 15 लाख, भूमी आणि जिंदगी विभागातून 3 कोटी 29 लाख, आकाश चिन्ह परवाना विभागातून 4 कोटी 20 लाख असे एकूण इतर विभागातून 87 कोटी 75 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. अशा सर्व विभागांमधून महापालिकेच्या तिजोरीत 2020-21 या आर्थिक वर्षात 2 हजार 846 कोटींचा महसूल जमा झाला आहे. 2019-20 आर्थिक वर्षात 3153 कोटी 8 लाखांचा महसूल मिळाला होता. त्यातुलनेत यंदा 307 कोटी 8 लाखांनी उत्पन्न घटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.