Mumbai News : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ; बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार 

एमपीसी न्यूज – कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी लोकसंख्या राज्यात आहे.

त्यासाठी आपल्याला 12 कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला 10 लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेसी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

गेले वर्षभर कोरोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे.

कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करावयाची आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.