Coronil doesn’t cure Corona : पतंजलीच्या ‘कोरोनील’मुळे कोरोना बरा होत नाही, दिशाभूल केल्यास कारवाई करणार – राजेंद्र शिंगणे

Patanjali's coronal does not cure corona, will take action if misled - Rajendra Shingane

एमपीसी न्यूज – पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनील’ औषधाने कोरोना बरा होत नाही. या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध ‘कोरोनील’ हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो.

आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने ‘कोरोनील’ची शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+नील) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे.

‘कोरोनील’चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत, नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आता आपल्या कोरोनील औषधाने कोरोनावर इलाज होतो, असा कधीही दावा केला नव्हता असा पवित्रा घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.