Pimpri : कॉर्पोरेट करात कपातीचा निर्णय स्वागतार्ह – संदीप बेलसरे

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे गुंतवणूक, रोजगार यांच्या संधी वाढतील, असा विश्वास पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे उद्योजकांकडून स्वागत केले जात आहे.

संदीप बेलसरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कॉर्पोरेट कराचा विद्यमान दर 30% होता. सेस–सरचार्ज मिळून तो 34.94 % पर्यंत भरावा लागत होता. आता तो 25.17 % झालेला आहे. 1 एप्रिल 2019 पासून नवा निर्णय लागू होईल. नव्या कर कपातीमुळे कंपनीची वर्षाला 1.45 लाख कोटी रुपये बचत होणार आहे. ही रक्कम कंपनी गुंतवणूक व उत्पादनावर खर्च करतील. जेणेकरून त्याचा उपयोग रोजगार संधी वाढण्यावर होईल. याचा एकूण फायदा बाजाराला होईल. या निर्णयामुळे कंपन्यांची देणी जवळपास 10% ने कमी होतील. कंपन्यांनी अन्य कुठलीही सवलत घेतली नसेल तर, त्यांना फक्त  22 % कर द्यावा लागेल. अंतिम मुदतीनंतर कमी कर दराचा पर्याय या कंपन्या निवडू शकतील.

नव्या  कंपन्यांना 15% कर : – 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणाऱ्या उत्पादक कंपन्यांना कराचा दर 15  % असेल. सरचार्ज व सेस सह त्यांना 17.1  % कर भरावा लागेल.  या कंपन्यांना अन्य insentiv मिळणार  नाही. नव्या कंपन्यांना याआधी 25 % कराचा दर होता. सरचार्ज व सेससह तो 29.12 % पर्यंत जात होता. नव्या कंपन्यांना 12 % सवलत नव्या निर्णयामुळे मिळाली आहे.

कर सवलती मुळे मेक इन इंडिया योजनेला मोठी चालना मिळेल. तसेच गुंतवणूक, रोजगार आणि आर्थिक उलाढाल वाढेल. तसेच नोकर कपात टळेल, खर्च कपात टळेल, खासगी क्षेत्रात नोकरीच्या नव्या संधी निर्माण होतील. उत्पादकता वाढेल. कर बचतीमुळे शिलकी पडलेला पैसा कंपन्या उत्पादनात, गुंतवणुकीत, कर्जफेडीत वापरतील बँकिंग व्यवस्था आणि बाजारात रोकड वाढेल. त्यामुळे सरकारचा महसूल सुद्धा वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like