Pimpri news: पालिका मानधनावर घेणार 107 शिक्षक

शिक्षकांची मुलाखत न घेता, त्यांच्या मेरिटनुसार त्यांची निवड करण्यात येणार

एमपीसी न्यूज – सरळ सेवेने शिक्षक भरतीस बंदी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका 107 शिक्षकांना मानधनावर घेणार आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक कोटी 12 लाख 35 हजार रुपये खर्च करून मानधनावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक विभागाने महापालिकेच्या 15 अनुदानित मराठी, 6 विनाअनुदानित उर्दू शाळेसाठी 107 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या माध्यमिक विभागाअंतर्गत मराठी उर्दू माध्यमाची 24 विद्यालये आहेत. 18 विद्यालयांपैकी 3 विनाअनुदानित विद्यालये आहेत. शासनाकडून शिक्षक भरतीला मनाई केली असल्याने दरवर्षी मानधनावर शिक्षक भरती केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे.

या वर्षी महापालिकेच्या मराठी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये 85 शिक्षकांची पदे तसेच उर्दू माध्यम विनाअनुदानित शाळांमधील 22 पदे आहेत. अशी 107 पदे भरण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मागील वर्षी 78 शिक्षकांची घड्याळी तासिकेवर भरती केली होती. त्यांना तासिका 85 रुपये दिले जात होते. मात्र महिन्याला तेवढे तास भरत नसल्याने वेतन कमी मिळू लागले. त्यामुळे अनेक शिक्षक सोडून गेले. त्यामुळे यावर्षी कमाल व किमान वेतन कायद्यानुसार 17 हजार 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

शिक्षकांची मुलाखत न घेता, त्यांच्या मेरिटनुसार त्यांची निवड करण्यात येणार आहे. सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती तसेच रजा यामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची आवश्‍यकता आहे, असे माध्यमिक विभागाचे पराग मुंढे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.