Pune News : बालेवाडी येथे पालिका उभारणार ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब’

एमपीसी न्यूज :  पालिकेने बालेवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर विकसित केले जाणारे मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब आता पीपीपी (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप) अंतर्गत विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या बालेवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर एकात्मिक वाहतूक सुधारणा अंतर्गत मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 2018 मध्ये महापालिकेच्या मुख्यसभेने स्मार्ट सिटीला हब उभारण्यास मान्यताही दिलेली होती. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये हे हब महापालिकेनेच विकसित करावे, असा ठराव मुख्यसभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने हे काम शासनाची मान्यता मिळेल या भरवशावर पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला असून त्याला मंजुरी मिळाली आहे.

महापालिकेस नवीन जकात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1999 मध्ये ही जागा देण्यात आली होती.  जकात बंद झाल्याने रिकाम्या पडलेल्या जागेवर स्मार्ट सिटीने शहरातील वाहतूक सुधारणे अंतर्गत एकाच ठिकाणी पीएमपी, खासगी प्रवासी वाहने, एसटी तसेच मेट्रोची सुविधा असावी या उद्देशाने मल्टी मॉडेल हब प्रस्तावित करत पालिकेस प्रस्ताव पाठविला होता.

पालिकेने त्यास मान्यता देत ही जागा स्मार्ट सिटीकडे हस्तांतरित केली. त्यानंतर यातील काही जागा हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोसाठी देण्यात आली असून उर्वरित जागेवर ट्रान्स्पोर्ट हब प्रस्तावित होते. मात्र, मुख्य सभेने पालिकेनेच हा हब विकसित करण्याचा ठराव केल्याने आता प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरी साठी ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.