Chinchwad News : नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एमपीसी न्यूज – पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली. अश्विनी यांचे पती मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी महिन्याभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महापालिकेच्या 2012 आणि 2017 च्या निवडणुकीत अश्विनी चिंचवडे चिंचवडगावातून निवडून आल्या. दोनही वेळेस शिवसेनेच्या चिन्हावर त्या निवडून आल्या आहेत. शेवटच्या वर्षात स्थायी समिती सदस्यपदासाठी पक्षाकडून त्यांचे नाव आले होते. पण, गटनेत्यांनी आपल्या समर्थक नगरसेविकेचे नाव दिले. तेव्हापासून चिंचवडे पक्षावर नाराज होत्या.

मावळचे जिल्हाप्रमुख असलेले त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी महिन्याभरापूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हातात घेत जय श्रीरामचा नारा दिला. तेंव्हापासून चिंचवडे यांच्या कार्यक्रमात भाजप नेते, कमळाचे चिन्ह झळकू लागले होते. पक्षविरोधी कारवाइचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.

“पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.